मुंबई

गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप; संजय राऊतांचे मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र

मुंबई : कुलाबा येथील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिस अधिकाऱ्याने धमकावल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.

राऊत यांनी पत्रात म्हटले आहे की, शुक्रवारी कुलाबा येथील बालगोपाल मित्र सार्वजनिक उत्सव मंडळाला भेट दिली असता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे गंभीर तक्रार केली. गणेशोत्सवासाठी महापालिकेची वैध परवानगी असतानाही डीसीपी ट्रॅफिक साऊथ झोन हेमराज राजपूत यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी धमकीवजा भाषेत संवाद साधल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, उपस्थित महिलांशी असभ्य वर्तन करण्यात आले आणि त्यांच्या हातातील मोबाईल फोन घेण्यात आल्याचा आरोपही राऊत यांनी पत्रातून केला आहे. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न पांडे हे सामाजिक कार्यकर्ते असून, महापालिका निवडणुकीत त्यांनी मकरंद नाईक यांना समर्थन न दिल्याच्या रागातून डीसीपी राजपूत यांनी असे वर्तन केले असावे, असा आरोपही पत्रात करण्यात आला आहे. मात्र, या राजकीय कारणासंदर्भातील आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

“या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य ते आदेश द्यावेत. मंडळाचे पदाधिकारी सध्या डीसीपी राजपूत यांच्या दहशतीखाली असून ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, अशी त्यांना भीती आहे,” असे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

या प्रकरणाची चौकशी करून संबंधित पोलिस अधिकाऱ्याविरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

Related Articles

Back to top button