मुंबई

Sanjay Raut Allegations On FDA | तुकाराम मुंडेंच्या FDA विभागावर संजय राऊतांचे गंभीर आरोप; ‘कारवाईच्या आड वसुली’चा दावा

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विभागातील कामकाजावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. राऊत यांनी मुंडे यांना पत्र लिहून FDA मधील काही अधिकारी हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्विक-कॉमर्स व्यावसायिकांना परवाना निलंबित करण्याची भीती दाखवून कथितरीत्या पैशांची मागणी करत असल्याचा दावा केला आहे.

राऊत यांनी आपल्या पत्रात तुकाराम मुंडे यांच्या FDAमधील कारवाईचे स्वागत केले आहे. मात्र मुंडे यांच्या कारवाईमुळे निर्माण झालेल्या दबावाचा काही अधिकारी गैरफायदा घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुंडे आयुक्त होण्यापूर्वी क्लोजिंग नोटीसच्या नावाखाली १० ते १२ हजार रुपयांची मागणी होत असल्याचे बोलले जात होते. आता हीच रक्कम ७५ हजार ते २ लाख रुपयांपर्यंत गेल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.

आरोपांची अधिकृत पुष्टी नाही

ठाण्यातील दोन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी एका क्विक-कॉमर्स कंपनीचा निलंबित परवाना पुन्हा मिळवून देण्यासाठी १७ ते १८ लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे.सदर आरोपांची अधिकृत पुष्टी झाली नाही. संबंधित अधिकारी, कंपनी आणि FDA प्रशासनाची भूमिका या प्रकरणात महत्त्वाची ठरणार आहे.

मुंडे इफेक्ट’ कार्यालयातही दिसायला हवा

“मुंडे इफेक्ट हॉटेलच्या किचनमध्येच नाही, तर FDAच्या कार्यालयातही दिसायला हवा,” असा टोला राऊत यांनी लगावला आहे. FDAमधील कथित गैरप्रकारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

राऊतांच्या प्रमुख मागण्या

  • वांद्रे, ठाणे आणि इतर विभागांतील कथित ‘क्लोजिंग नोटीस रेट कार्ड’ची स्वतंत्र चौकशी करावी.
  • निलंबित परवाने पुन्हा देण्याच्या प्रकरणांची तपासणी करावी.
  • Customer Complaint वरून होणाऱ्या धाडींची पडताळणी बंधनकारक करावी.
  • बनावट तक्रारी करणाऱ्यांवर कारवाई करावी.
  • नोटीस, सुनावणी आणि निलंबनाची कायदेशीर प्रक्रिया बायपास करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी.
  • ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांवरील १७-१८ लाख रुपयांच्या आरोपाची स्वतंत्र चौकशी करावी.
  • प्रत्येक परवाना निलंबन आणि पुनर्स्थापनेची कारणे व सुनावणीचा तपशील सार्वजनिक करावा.

संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर आता तुकाराम मुंडे आणि अन्न व औषध प्रशासनाकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, तसेच या प्रकरणाची चौकशी होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button