मुंबई

साकीनाक्यात लॉजच्या कामादरम्यान गॅलरी कोसळली; दोन जखमी

मुंबई : चांदिवली विधानसभा मतदारसंघातील साकीनाका परिसरात लॉजच्या कामादरम्यान जुन्या बांधकामाची बाहेर आलेली गॅलरी अचानक कोसळून फुटपाथवरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पडल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एका मुलीला १२ टाके पडले असून, एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

साकीनाका परिसरात लॉजिंगचे काम सुरू असताना संबंधित गॅलरीला कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. गॅलरीला संरक्षक ग्रील किंवा अन्य सुरक्षा उपाययोजनाही करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा दावा मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी केला आहे.

दरम्यान, चांदिवली परिसरात अशा प्रकारचे अंदाजे २०० अनधिकृत लॉज व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सामान्य नागरिकांच्या घरांवर कारवाई करण्यासाठी एल वॉर्डचे अधिकारी तातडीने पोहोचतात; मात्र अनधिकृत लॉजिंग व्यवसायांवर केवळ नोटिसा बजावून कारवाई थांबवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अनधिकृत बांधकामांविरोधातील प्रकरणे न्यायालयात गेल्यानंतर एल वॉर्डच्या वकिलांकडून प्रशासनाची बाजू योग्य पद्धतीने मांडली जात नसल्याने संबंधितांना न्यायालयाकडून स्थगिती मिळते, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे अशा व्यवसायांना नेमके कोणाचे संरक्षण आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

या घटनेनंतर अनधिकृत लॉज व्यवसाय आणि धोकादायक बांधकामांविरोधात तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन प्रशासनाने दुर्घटनेची चौकशी करावी आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे चांदवली विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button