मुंबई

SIR वरून काँग्रेसवर रितू तावडेंचा निशाणा; माफी मागण्याची मागणी

मुंबई : विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) वरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. SIR संदर्भात काँग्रेसकडून करण्यात येणारे आरोप हे चुकीच्या माहितीवर आणि ‘फेक नॅरेटिव्ह’वर आधारित असल्याचा दावा तावडे यांनी केला. काँग्रेसने केलेल्या आरोपांबद्दल माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

SIR ही संविधानिक प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगत तावडे म्हणाल्या की, मतदार याद्यांचे वेळोवेळी पुनरीक्षण होणे आवश्यक आहे. SIR संदर्भातील प्रमुख निर्णय कोणत्याही एका अधिकाऱ्याने घेतले नसून संबंधित समितीने एकत्रितपणे निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला. एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या आधारे काँग्रेसकडून या विषयावर आंदोलन आणि आरोप करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

“मी संविधानिक पदावर असल्याने संविधानिक स्वायत्त संस्थेची भूमिका मांडत आहे. मी निवडणूक आयोगाची वकिली करत नाही,” असे तावडे यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेचे अधिकारी SIR प्रक्रियेत पारदर्शकपणे काम करत असून अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून मतदार यादीच्या कामात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.

‘मतदार याद्यांबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न’

फॉर्म-६ वरून वाद निर्माण करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप तावडे यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर केला. अपात्र मतदारांचा समावेश केला जाणार नाही, तसेच पात्र मतदारांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याची संधी दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्र मतदारांना दावे व हरकती नोंदवण्याची प्रक्रिया उपलब्ध आहे.

‘घुसखोर फेरीवाल्यांना थारा नाही’

मुंबईतील बोगस मतदार आणि घुसखोर फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरही तावडे यांनी भाष्य केले. “घुसखोरांना थारा नाही. घुसखोर फेरीवाल्यांना आपण काढणारच,” अशी भूमिका त्यांनी मांडली. नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

“मुंबईची महापौर असले तरी मी भाजपची कार्यकर्ता आहे,” असे सांगत तावडे यांनी SIRच्या मुद्द्यावर भाजपची भूमिका स्पष्टपणे मांडली.

‘पराभव झाला की संस्थांना बदनाम केले जाते’

निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसकडून घटनात्मक संस्थांवर प्रश्न उपस्थित केले जात असल्याचा आरोपही तावडे यांनी केला. “ज्या ठिकाणी भाजप जिंकणार तिथे मत चोरी आणि त्यांच्या विजय झाला की निवडणूक आयोग चांगला,” अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली.

“जेव्हा जेव्हा ते पराभूत होतात, तेव्हा घटनात्मक संस्थांना बदनाम केले जाते,” असा आरोप करत काँग्रेसने SIR संदर्भातील आरोप मागे घेऊन माफी मागावी, असा आग्रह तावडे यांनी धरला.

Related Articles

Back to top button