गरब्यासाठी जोडीदार भाड्याने? उपरोधिक जाहिरात व्हायरल, सोशल मीडियावर संताप

प्रशांत गोडसे
मुंबई : नवरात्रीच्या तोंडावर गरब्यासाठी ‘जोडीदार भाड्याने उपलब्ध’ असल्याची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
गुजरातमधील क्रिश मिस्त्री (@krish.mistry_17) या इंस्टाग्राम वापरकर्त्याने ही उपरोधिक पोस्ट शेअर केली होती. त्यात सिल्व्हर (१००० रुपये – दोन तास गरबा, मॅचिंग कपडे, मूलभूत स्टेप्स आणि सेल्फी), गोल्ड (१५०० रुपये – चार तास, रील्स व बनावट भेटीची कहाणी) आणि प्लॅटिनम (२००० रुपये – रात्रभर साथ) असे तीन पॅकेज दाखवले होते. “This Navratri, don’t dance alone” असे टायटल होते. ही पोस्ट मनोरंजनासाठी आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी केली असल्याचे नंतर स्पष्ट झाले. वास्तविक सेवा नव्हती.
तरीही ‘जोडीदार भाड्याने’ हा उल्लेख चर्चेचा विषय ठरला. काहींना वाटते की ही फक्त सोबत उपलब्ध करून देण्याची कल्पना असू शकते. पण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाच्या नावाखाली अशी व्यावसायिक जाहिरात करणे योग्य आहे का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.
नवरात्र हा भक्ती आणि आनंदाचा सण आहे. त्यामुळे उत्सवाला व्यावसायिक रूप देण्यावर नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे, अशा जाहिरातींमागे फसवणूक होऊ शकते, असा धोकाही आहे. गुजरात पोलिसांनी याबाबत सावधान राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी व्यक्तींना पैसे किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका, असे त्यांनी सांगितले आहे.
या उपरोधिक जाहिरातीनंतर इतर अनेक पोस्ट्सही समोर आल्या आहेत. आता या प्रकारामागील नेमका उद्देश काय आहे आणि संबंधितांची भूमिका काय, याकडे लक्ष लागले आहे.
टिप : वरील बातमी व्हायरल सोशल मीडिया पोस्ट आणि नेटिझन्सच्या प्रतिक्रियांवर आधारित आहे. मुंबई समाचार या पोस्टमधील कोणत्याही प्रकारच्या दाव्यांच्या प्रामाणिकतेची स्वतंत्रपणे पडताळणी करत नाही.



