मुंबई

‘निरोगी युवक, निरोगी शहर’चा संदेश देत ‘रेड रन २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : ‘Run To End AIDS’ या जनजागृती मोहिमेअंतर्गत मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेतर्फे आयोजित ‘रेड रन २०२६’ मॅरेथॉनला महाविद्यालयीन युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ४ किलोमीटर अंतराच्या या मॅरेथॉनमध्ये ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते रविवारी सकाळी ध्वज दाखवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी महापौर रितू तावडे यांनी ‘निरोगी युवक, निरोगी शहर’ हा मंत्र अंगीकारण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, मॅरेथॉन ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून आरोग्य, शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणारी चळवळ आहे. एचआयव्ही/एड्स प्रतिबंध आणि जनजागृतीसाठी प्रशासनासोबत तरुणाईचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेमार्फत एचआयव्ही/एड्स रोखण्यासाठी आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आयोजित ‘रेड रन २०२६’मध्ये २०० हून अधिक कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) स्वयंसेवक धावमार्गावर कार्यरत होते.

स्पर्धेतील विजेत्या युवक-युवतींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या विजेत्यांना राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेतर्फे ऑक्टोबर २०२६ मध्ये बिहार येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ‘रेड रन मॅरेथॉन’मध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

यावेळी महानगरपालिका शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या ‘किशोरवयीन शिक्षण कार्यक्रम’अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.

सध्या मुंबईतील १९० महाविद्यालयांमध्ये ‘रेड रिबन क्लब’च्या माध्यमातून, तर २५० महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही/एड्स प्रतिबंधात्मक जनजागृती केली जात आहे.

या कार्यक्रमास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे, मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक तथा महानगरपालिकेचे उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि धावपटू उपस्थित होते.

Related Articles

Back to top button