राणीच्या बागेत काचेचा बोगदा, पालिकेच अत्याधुनिक मत्स्यालय

मुंबई: भायखळा येथील वीर जिजाबाई भोसले उद्यानात पर्यटकांना काचेच्या बोगद्यातून कलरफुल जलचर प्राण्यांचा अनुभव घेता येणार आहे.जिजामाता उद्यान ज्याला राणी बाग म्हणूनही ओळखले जाते तिथे अत्याधुनिक मत्स्यालयाची निर्मिती केली जात आहे.जानेवारी २०२७ मध्ये पर्यटकांना ही पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
केवळ मुंबईच नाही, तर भारत आणि परदेशातील पर्यटकांच आकर्षण भायखळ्याच राणी बाग म्हणजेच जिजाबाई भोसले उद्यान आहे. वनस्पती शास्त्र आणि प्राणी संग्रहालयात ३६ मित्र काचेचा बोगदा तयार करण्यात येत आहे. सुमारे ६० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या टनेल अॅक्वेरिअममध्ये भारतीय आणि विदेशी प्रजातींचे सागरी मासे पाहायला मिळतील. या टनेल अॅक्वेरिअमचे काम जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी प्राणीसंग्रहालयाला भेट देत कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हा प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यासोबतच त्यांनी इतर प्रकल्पांशी संबंधित कामाचाही आढावा घेतला.
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात एक घुमटाच्या आकाराचे बोगद्याच्या स्वरूपातील मत्स्यालय बांधले जात आहे. मत्स्यालयाच्या बोगद्याचा विस्तार करण्याचे आणि सध्याच्या पेंग्विनच्या पिंजऱ्याचे काम एका वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त भिडे यांनी डायल आहे. हे मत्स्यालय पेंग्विनच्या पिंजऱ्याशेजारी ५,००० चौरस फूट जागेवर बांधले जात आहे.

यामध्ये ७० पेक्षा जास्त सागरी आणि जलचर प्रजाती ठेवल्या जातील. काचेच्या बोगद्यातून जाताना पर्यटकांना सागरी जीवनाचा एक अद्भुत अनुभव मिळेल. यामध्ये दोन बोगदे असतील. त्यामुळे, दोन ‘वॉक-थ्रू’ बोगदे बांधले जात आहेत, ज्यात १४-मीटरचा ‘कोरल फिश’ बोगदा आणि ३६-मीटरचा ‘डीप ओशन’ बोगदा, तसेच ३६०-डिग्री दृश्ये देणाऱ्या ‘पॉप-अप’ खिडक्यांचा समावेश आहे. बोगद्याचे प्रवेशद्वार घुमटाकार ॲक्रिलिक काचेचे बनवलेले असेल, ज्यामुळे पाण्याखाली असल्याचा भास होईल.
२०२६-२७ च्या पालिका अर्थसंकल्पात राणीबागच्या विस्ताराची घोषणा करण्यात आली होती, ज्याअंतर्गत येथे एक मत्स्यालय आणि आफ्रिकन-थीमवर आधारित ‘एक्झॉटिक झू’ बांधले जात आहे, ज्यात प्रामुख्याने ‘चीता रेस्टॉरंट’ असेल, जे आफ्रिकन झू पासून प्रेरणा घेऊन बांधले जात आहे.
राणीबागच्या विस्ताराचा एक भाग म्हणून, १८ प्राण्यांच्या अधिवासांसह एक ‘एक्झॉटिक झू’ विकसित केले जाईल. यामध्ये ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि आफ्रिकेतील प्रजातींचा समावेश करण्याची योजना आहे. प्यूमा, टॅमरिन, मार्मोसेट, रिंग-टेल्ड लेमूर, मीरकट आणि जायंट अँटइटर यांसारख्या प्राण्यांसाठी विशेष पिंजरे बांधले जातील.
विदेशी प्रजाती आणण्यापूर्वी ‘केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणा’कडून परवानगी घेणे आवश्यक असेल. या प्रकल्पात आफ्रिकन संकल्पनेवर आधारित दोन मजली ‘चित्ता रेस्टॉरंट’चाही समावेश आहे, जिथे चित्ता, रिंग-टेल्ड लेमूर, जिराफ आणि झेब्रा पाहता येतील.
पालिकेच्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ मध्ये ह्या उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाला भेट देणाऱ्यांची संख्या ३२ ते ३५ लाख होती, ज्यात शनिवार, रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी सर्वाधिक गर्दी होती.
ह्या काचेच्या बोगद्यामुळे मुंबईच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवल्या जाणार आहे.



