मुंबई

Dipke vs Athawale: दिपकेंना रामदास आठवलेंचा थेट इशारा; ‘माफी मागा, वक्तव्य थांबवा

मुंबई : सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. दिपके यांनी अशी वक्तव्ये थांबवावीत, अन्यथा रिपब्लिकन पक्षाकडून त्यांना अस्मान दाखवू असा कडक इशारा आठवले यांनी दिला.

दिपके यांनी शिवाजी पार्क येथील आंदोलनात गांधी, आंबेडकर आणि नेहरू यांच्या भूमिकेबाबत भाष्य केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत चुकीची माहिती किंवा वक्तव्य करू नये, असे त्यांनी म्हटले.

दिपके यांना काही तरुणांचा पाठिंबा मिळत आहे, ही चांगली बाब आहे. मात्र, या पाठिंब्याचा उपयोग विधायक कामासाठी करावा. तरुणांच्या पाठिंब्यामुळे बेताल वक्तव्य करण्याचे धाडस वाढू नये, असेही आठवले यांनी म्हटले.

मोदी, फडणवीसांवरील वक्तव्यावरही आक्षेप

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत दिपके यांनी केलेल्या वक्तव्यांवरही आठवले यांनी आक्षेप घेतला. लोकशाहीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर टीका करण्याचा अधिकार असला तरी भाषा आणि वक्तव्ये मर्यादित असावीत, असे त्यांनी सांगितले.

दिपके यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणीही आठवले यांनी केली. बेताल वक्तव्ये थांबवली नाहीत तर रिपब्लिकन पक्षाकडून कडक भूमिका घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

‘डॉ. आंबेडकरांनी देशाला पुढे नेले’

“पंडित नेहरूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुढे आणले, असे म्हणणे योग्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण देशाला पुढे नेले,” अशी भूमिका आठवले यांनी मांडली.

Related Articles

Back to top button