सत्तेतले रेडे ज्ञानेशाकडून वेद वदवतायत! राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर घणाघात

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर ज्ञानेश कुमार यांच्यावर विरोधकांकडून टीका होत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच या मागणीसाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत निवडणूक आयोगाच्या कारभारावर उपरोधिक भाष्य केले. “ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत,” असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगातील कथित मतभेदांचा संदर्भ देत ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. गेल्या दोन दिवसांपासून ज्ञानेश कुमार गप्प असून त्यांना बोलते करणारेही कुठे दिसत नाहीत, असा दावा त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोशल मीडियावरील पोस्ट
ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद (?) वदवतायंत. असो ,
गेले २ दिवस ज्ञानेश कुमार हे गप्प झालेत आणि त्यांना बोलतं करणारे पण कुठेच दिसत नाहीयेत. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्याना हाताशी धरून आपण कसे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत हे भारतीय जनता पक्ष सांगत होतं हे लक्षात आलं असेल. आणि यासाठी त्यांनी २०२५ पासून एसआयआर हे नवं अस्त्र हाती घेतलं आहे.
एसआयआरमध्ये काय घोळ झालेत आणि यावर निवडणूक आयुक्तच बोलत आहेत हे बघितल्यावर, एकच पर्याय दिसतो तो म्हणजे ही एसआयआरची संपूर्ण प्रक्रियाच रद्द केली गेली पाहिजे. आणि यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही मागणीच आहे की आत्ता झालेलं एसआयर पूर्ण रद्द करा, त्यात कसे घोळ झाले याची निष्पक्ष चौकशी करा आणि नव्याने ही प्रक्रिया करा.
तसेच , यापुढे सर्व निवडणुका व्होटिंग मशिनवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवरच घेण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे !
तरच इतक्या वर्षांच सत्तेचं सत्य बाहेर येईल !
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एसआयआरची प्रक्रिया रद्द करण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र घेण्याचे आवाहन केले आहे आता विरोधकांकडून राज ठाकरे यांना कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.



