राज ठाकरेंची सूचक पोस्ट चर्चेत; ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते… तूर्तास एवढेच!’
मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या एका सूचक पोस्टने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच!’ अशा अवघ्या दोन ओळींची पोस्ट राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर केली आहे. मात्र, राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नसल्याने त्यांचा नेमका रोख कोणाकडे आहे, हे स्पष्ट झालेले नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील राजभाषा संमेलनादरम्यान महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य असल्याचे विधान केले. महाराष्ट्रात अनेक भाषांचा विकास झाला असून त्यांचा सन्मानही झाला आहे, असे शाह यांनी म्हटले. त्यांच्या या विधानावर मराठी भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पोस्टचा संबंध अमित शाह यांच्या या वक्तव्याशी जोडला जात आहे.
दुसरीकडे दिशा सालियान प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून या प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी केलेल्या सूचक पोस्टचा संबंध या घडामोडींशी आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे. मात्र, राज ठाकरे यांनी स्वतः पोस्टचा संदर्भ स्पष्ट केलेला नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पोस्टमधील ‘तूर्तास एवढेच!’ या वाक्यानेही चर्चेला वेगळेच वळण मिळाले आहे. त्यांच्या या दोन ओळींच्या पोस्टमागे नेमका कोणता राजकीय संदेश याविषयी तर्क-वितर्क लावले जात आहे. अमित शाहांचे विधान, दिशा सालियान प्रकरण किंवा सध्याच्या अन्य राजकीय घडामोडींवर राज ठाकरेंनी भाष्य केले आहे का, याबाबत आता मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
मात्र, जोपर्यंत राज ठाकरे स्वतः या पोस्टचा संदर्भ स्पष्ट करत नाहीत, तोपर्यंत त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या दोन ओळींच्या या पोस्टने महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र चर्चेला चांगलाच तडका दिला आहे.



