Property Registration: जमीन-मालमत्ता खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; १ ऑक्टोबरपासून नवा नियम

प्रशांत गोडसे
मुंबई : मालमत्तेच्या खरेदी-विक्रीसह विविध प्रकारच्या दस्तनोंदणी प्रक्रियेत होणारी फसवणूक रोखण्यासाठी राज्याच्या महसूल विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबरपासून दस्तनोंदणीसाठी आधार ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. आधार नसल्यास संबंधित दस्तनोंदणी करता येणार नाही, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, यासंदर्भातील राजपत्रही प्रसिद्ध करण्यात आले आहे. खरेदी-विक्री, गहाणखत, वाटणी यासह ६३ प्रकारच्या दस्तनोंदणीसाठी आधारद्वारे ओळख पडताळणी केली जाणार आहे.
खोटे पक्षकार, साक्षीदारांना आळा
मालमत्ता व्यवहारात खोटे पक्षकार किंवा साक्षीदार उभे करून होणाऱ्या फसवणुकीला या निर्णयामुळे आळा बसेल, असा दावा महसूल विभागाने केला आहे. आधार पडताळणीमुळे नोंदणी प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी होऊन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
आधार नसल्यास पर्यायी व्यवस्था
ज्यांच्याकडे अद्याप आधार क्रमांक उपलब्ध नाही, त्यांना आधार नोंदणीची पावती, अन्य सरकारी ओळखपत्र आणि संबंधित व्यक्तीशी नाते सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करावी लागतील. या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच संबंधित दस्तनोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
बालकांसाठी स्वतंत्र तरतूद
१८ वर्षांखालील मुलांच्या बाबतीत माता-पिता किंवा कायदेशीर पालकांच्या संमतीने आधार नोंदणीची प्रक्रिया केली जाईल. केवळ आधार क्रमांक उपलब्ध नसल्यामुळे कोणत्याही बालकाला किंवा पात्र लाभार्थ्याला दस्तनोंदणीच्या लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी तरतूद अधिसूचनेत करण्यात आली आहे.



