मुंबई

पवई तलावात जाणारे मलजल पूर्णतः रोखणार

मुंबई : पवई तलावात मिसळणाऱ्या मलजलाला आळा घालण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांना यश आले असून, तलावात जाणारे मलजल १ ऑक्टोबरपासून पूर्णतः रोखले जाणार आहे. तलावात मलजल सोडणारे २० विसर्ग प्रवाह ‘इंटरसेप्ट’ करून ते मलजल प्रक्रिया केंद्रांकडे वळविण्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. या कामासाठी ३ हजार ५६ मीटर लांबीच्या नवीन मलनिस्सारण वाहिन्या अंथरण्यात आल्या आहेत.
अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी बुधवारी प्रकल्पस्थळाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. आदि शंकराचार्य मार्गावरील १८ मलजल प्रवाह गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून भांडुप मलजल प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात आले आहेत. तर पेरूगेट परिसरातील दोन प्रवाह फिल्टरपाडा मलजल प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात आले आहेत. या कामामुळे पवई तलावातील जलप्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याचे महापालिकेने सांगितले.

पवई तलावात वाढत्या नागरीकरणामुळे दररोज सुमारे १८ दशलक्ष लिटर मलजल मिसळत होते. त्यामुळे तलावाच्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत होता. तलावाची पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेऊन मलजल प्रवाह रोखण्याची कार्यवाही करण्यात आली.

२०२७ पर्यंत नवे प्रक्रिया केंद्र

पवईतील वापरात नसलेल्या मलजल उदंचन केंद्राच्या जागेवर दररोज ८ दशलक्ष लिटर क्षमतेचे आधुनिक मलजल प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्रात प्रक्रिया केलेले ८ दशलक्ष लिटर पाणी पुन्हा तलावात सोडण्यात येणार आहे. निविदेनुसार प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत डिसेंबर २०२८ आहे. मात्र, मे २०२७ पर्यंत हे केंद्र कार्यान्वित करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यानंतर तलावात येणाऱ्या १६ दशलक्ष लिटर मलजलापैकी ८ दशलक्ष लिटर या केंद्राकडे, तर उर्वरित ८ दशलक्ष लिटर भांडुप केंद्राकडे वळविले जाणार आहे.

८५ टक्के जलपर्णी हटवली

पवई तलावातील जलपर्णी हटविण्याचे कामही सुरू असून, दोन हार्वेस्टरच्या माध्यमातून ही कार्यवाही केली जात आहे. तलावातील जलपर्णीचे अंदाजे प्रमाण २४ हजार मेट्रिक टन असून, २९ सप्टेंबरपर्यंत २० हजार ३४० मेट्रिक टन म्हणजेच सुमारे ८५ टक्के जलपर्णी काढण्यात आली आहे.
तलावातील मलजल बंद झाल्यानंतर जलपर्णीचा प्रादुर्भाव कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, सध्याच्या पाण्यातील सेंद्रिय घटकांमुळे जलपर्णी पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी जैविक तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजनांचा अभ्यास केला जात आहे. येत्या एक ते दोन महिन्यांत योग्य उपाययोजना सुरू करण्याचे नियोजन असल्याचे अभिजीत बांगर यांनी सांगितले.

ऑगस्ट २०२५ मध्ये सुरू झालेले मलजल प्रवाह वळविण्याचे काम १३ महिन्यांत पूर्ण करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button