मुंबई

श्रद्धेसोबत पर्यावरण संतुलनही साधले; पालिकेच्या तयारीचे आशिष शेलारांकडून कौतुक

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या तयारीचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी कौतुक केले. भाविकांची श्रद्धा जपत पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी पालिकेने चांगले नियोजन केल्याचे शेलार यांनी सांगितले.

स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे गणेशमूर्ती विसर्जनाच्या तयारीची पाहणी करून शेलार यांनी पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या विविध व्यवस्थांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आपत्ती व्यवस्थापन, निर्माल्य संकलन, आरोग्य तपासणी व प्रथमोपचार केंद्रे, दिशादर्शक फलक तसेच भाविकांच्या सुविधांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थांची पाहणी केली.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक विसर्जनासाठी घराबाहेर पडणार असल्याने पालिकेने विविध स्तरांवर नियोजन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून, भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत विसर्जन करता यावे यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरण संवर्धनावरही पालिकेने विशेष भर दिला आहे. निर्माल्याचे स्वतंत्र संकलन, विसर्जनस्थळी आवश्यक सुविधा आणि पर्यावरणपूरक व्यवस्थांमुळे श्रद्धा आणि पर्यावरण यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या नियोजनाबद्दल शेलार यांनी पालिका प्रशासनाचे समाधान व्यक्त केले.

यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगर) डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव, उपायुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त (डी विभाग) संतोष साळुंके यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button