महाराष्ट्रमुंबई

Update ; शिवाजी पार्क आंदोलनावर नितेश राणेंची टीका; आक्षेपार्ह पोस्टवर कारवाईची मागणी

मुंबई : महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही आंदोलन करण्यावर सीजेपी ठाम आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी आंदोलनावरून सीजेपीवर टीका केली आहे. आंदोलनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा अपमान केला जात असल्याचा आरोप राणे यांनी केला. ‘शिवरायांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला.

भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राणे बोलत होते. सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणी आंदोलनाचे आयोजक अभिजित दिपके यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी राणे यांनी केली.

ठाकरे बंधूंवरही निशाणा

शिवाजी महाराज आणि हिंदुत्वाच्या विचारांचा दावा करणाऱ्या ठाकरे बंधूंनी अशा आंदोलनाला पाठिंबा देऊ नये, अशी टीका राणे यांनी केली. आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीने दिला आहे. मात्र, आंदोलनाच्या नावाखाली कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पोलिसांकडे कारवाईची मागणी

आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट आणि प्रस्तावित आंदोलनाची मुंबई पोलिसांनी दखल घ्यावी. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही नितेश राणे यांनी केली.

Related Articles

Back to top button