नेहरू विज्ञान केंद्र-तारांगण उड्डाणपूल ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश

मुंबई, : मुंबईत वाहतूक सुरळीत आणि वेगवान होण्यासाठी अनेक ठिकाणी नवीन उड्डाणपुलाच्या कामाची उभारणी सुरू आहे.वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्र ते नेहरू तारांगणदरम्यान सुरू असलेल्या उड्डाणपूल व सब वे प्रकल्पाचे काम येत्या ३१ जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. त्यांनी बुधवारी (३० सप्टेंबर) प्रकल्पस्थळी भेट देऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि संसाधनांचे योग्य नियोजन करून कामाचा वेग वाढवावा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
नेहरू विज्ञान केंद्राच्या बाजूला १२०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य पायलिंगचे काम पूर्ण झाले असून, १८ पैकी १७ पाइल कॅप, १८ पैकी १७ पिअर आणि १८ पैकी १७ पिअर कॅपची कामे पूर्ण झाली आहेत. जिजामाता नगरच्या बाजूचे मुख्य पायलिंगचे कामही पूर्ण झाले असून, १७ पैकी १७ पाइल कॅप, पिअर आणि पिअर कॅपची कामे पूर्ण झाली आहेत.

प्रकल्पासाठी आवश्यक १४ पैकी १४ पोर्टल बीमची निर्मिती पूर्ण झाली असून, १८ पैकी १७ गर्डर स्पॅनची निर्मिती पूर्ण झाली आहे. उर्वरित एका गर्डर स्पॅनचे काम सुरू आहे. प्रत्यक्ष उभारणीमध्ये १४ पैकी १३ पोर्टल बीम आणि १८ पैकी ९ गर्डर स्पॅन उभारण्यात आले आहेत. तसेच १८ पैकी सात स्पॅनच्या डेक स्लॅबचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून, आणखी दोन स्पॅनचे काम प्रगतिपथावर आहे.

प्रवासाचा वेळ १५ मिनिटांनी कमी होणार
या उड्डाणपुलामुळे वरळी नाका परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या नेहरू विज्ञान केंद्राकडून जाणाऱ्या वाहनांना वरळी नाका (आचार्य अत्रे चौक) येथून वळसा घालावा लागतो. उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ सुमारे १५ मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. ई. मोझेस मार्गावरून अॅनी बेझंट मार्ग तसेच धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गाकडे जाण्यासाठी अधिक थेट मार्ग उपलब्ध होणार आहे. लोअर परळ, महालक्ष्मी आणि करी रोडकडून येणाऱ्या वाहनांनाही या मार्गाचा लाभ होणार आहे.
प्रकल्पाचे काम विविध विभागांमध्ये समन्वय साधून वेगाने पुढे न्यावे. तसेच वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून वाहतूक व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा, असे निर्देश बांगर यांनी दिले.



