मुंबई

Controversy Again! ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ म्हणताच वाद; नरेंद्र मेहतांना रोखणार कोण? सीएम फडणवीस काय भूमिका घेणार?

मीरा-भाईंदर : भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी मीरा-भाईंदरचा उल्लेख ‘जैनांची नगरी’ असं म्हणत नवीन वाद ओढवून घेतला आहे.
त्यामुळे नवीन राजकीय वाद पेटला आहे. मनसेने या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेत, ‘मीरा-भाईंदर कोणत्याही एका समाजाची नाही, तर सर्व समाजांची आहे’, अशी भूमिका मांडली आहे.

मनसेचे विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे यांनी मेहतांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. शहरात आगरी, कोळी, मराठी यांच्यासह विविध समाजांचे नागरिक राहतात. त्यामुळे शहराची ओळख एका समाजापुरती मर्यादित करणारी वक्तव्ये करू नयेत, असा इशारा मनसेने दिला आहे. यापुढे अशी वक्तव्ये झाल्यास आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला आहे.

मेहतांच्या वक्तव्यांवरून आधीही वाद

नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित यापूर्वीच्या काही वक्तव्यांवरूनही राजकीय वाद झाले आहेत. सप्टेंबरमध्ये त्यांच्या सेव्हन स्क्वेअर अकॅडमी शाळेने पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट आणि काही कंदमुळे आणू नयेत, असे आवाहन केले होते. त्यावर मनसेने आंदोलन केले. त्यानंतर शाळेने हे आवाहन मागे घेतले. मेहतांनी हा सक्तीचा निर्णय नसून अहिंसेच्या भावनेतून केलेले आवाहन असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

जुलै २०२५ मध्ये मीरा-भाईंदरमधील मराठी भाषिकांच्या आंदोलनावरूनही मेहतांच्या भूमिकेवरून राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे आता ‘जैनांची नगरी’ या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मेहता चर्चेत आले आहेत.

‘मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न’ असा आरोप

काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे यांनी मेहतांवर भाषिक तेढ निर्माण केल्याचा आरोप केला आहे. जाणूनबुजून मराठी माणसाला डिवचले जात असल्याचा दावा राणे यांनी केला आहे. दरम्यान, शाळेतील आहाराच्या वादावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही यापूर्वी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे सध्याच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची भूमिका काय असणार, याकडेही लक्ष लागले आहे.

भाजप नेतृत्वाची भूमिका काय?

नरेंद्र मेहता हे भाजपचे आमदार असल्याने आता त्यांच्या वक्तव्यावर भाजप नेतृत्व काय भूमिका घेणार?. शहराची सामाजिक आणि भाषिक सलोखा बिघडवणारी वक्तव्ये टाळण्याबाबत पक्ष नेतृत्व मेहतांना काही सूचना करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

‘मेहतांना रोखणार कोण?’ आणि ‘मुख्यमंत्री फडणवीस या प्रकरणावर काय भूमिका घेणार?’ हे प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत.

टीकेनंतर नरेंद्र मेहता बॅकफूटवर?

‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ या वक्तव्यावरून चौफेर टीका झाल्यानंतर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सदर कार्यक्रम राजकीय नव्हता, असे मेहता यांनी स्पष्ट केले.

आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, अशी भूमिका नरेंद्र मेहता यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादावर आता पडदा पडणार का, याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button