मुंबई

Election Commission Controversy: ‘भाजपच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; ज्ञानेशकुमारांच्या बचावावर नाना पटोलेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या कारभारावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘ज्ञानेशकुमारांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं भाजपचे मुख्यमंत्री आणि मंत्री का देतात? भाजपच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला आहे,’ असा टोला पटोले यांनी लगावला.

नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे; मात्र मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावर ज्ञानेशकुमार काम करत असून त्यातून लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण होत असल्याचे पटोले म्हणाले.

राहुल गांधींच्या आरोपांनंतर भाजपकडून बचाव?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे आरोप पुराव्यांसह मांडले आहेत. या आरोपांमुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, ज्ञानेशकुमार यांच्यावर होणाऱ्या टीकेला भाजपचे मुख्यमंत्री आणि मंत्री उत्तर देत असल्याचे पटोले म्हणाले.

निवडणूक आयोगातील कथित गैरप्रकार समोर आल्यास भाजप अडचणीत येईल, त्यामुळे ज्ञानेशकुमार यांचा बचाव केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘Form-6 मध्ये मनमानी बदल’

मतदार नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या Form-6 मध्ये मनमानी पद्धतीने बदल करण्यात आल्याचा आरोप पटोले यांनी केला. यामुळे मोठ्या संख्येने तरुण तसेच विविध समाजातील मतदारांची नावे मतदारयादीतून कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले.

पश्चिम बंगालमधील मतदारयादीतील नावांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. लाखो मतांमध्ये कपात करण्यात आल्याचा दावा करत या प्रक्रियेतील सुनावणीबाबतही त्यांनी स्पष्टीकरण मागितले.

‘लोकशाहीसाठी लढणाऱ्यांच्या पाठिशी काँग्रेस’

ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात शिवसेना आणि मनसेकडून मोर्चे काढले जात असल्याबाबत विचारले असता पटोले यांनी लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या पक्ष-संघटनांना काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे सांगितले.

‘मतचोरी आणि निवडणूक फिक्सिंगच्या आरोपांविरोधात देशातील जनतेने लढा सुरू केला आहे. ही सुरुवात असून लढाई पुढेही सुरू राहील,’ असे पटोले म्हणाले. ज्ञानेशकुमार यांना पदावरून हटवण्यासाठी जे आंदोलन करत आहेत, त्यांच्या सोबत काँग्रेस पक्ष असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button