मुंबई

मुंबईला पाणी मुबलक,कपात मात्र कायम, ९६.६४ टक्के पाणीसाठा; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतरच – अभिजित बांगर

मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये तब्बल ९६.६४ टक्के पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरातील पाणीकपात कायम असल्याने महापालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. निवासी क्षेत्रातील १० टक्के आणि व्यावसायिक क्षेत्रातील २० टक्के पाणीकपात तातडीने रद्द करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. मात्र, उपलब्ध पाणीसाठा पुढील वर्षी ३१ ऑगस्टपर्यंत पुरविण्याचे नियोजन, पावसातील अनिश्चितता, संभाव्य एल निनोचा प्रभाव आणि बाष्पीभवन यांचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पाणीकपातीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.

जुलैमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. सध्या सातही तलावांमध्ये ९६.६४ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, जूनमध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याची आवश्यकता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.

विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी तलावांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही अनेक भागांत नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. काही भागांत १० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीकपात होत असल्याचा दावा करत त्यांनी निवासी क्षेत्रातील १० टक्के आणि व्यावसायिक क्षेत्रातील २० टक्के कपात रद्द करण्याची मागणी केली. तसेच पाणीगळती, पाणीचोरी आणि टँकरच्या माध्यमातून होणाऱ्या गैरप्रकारांवर नियंत्रण आणण्याची मागणी त्यांनी केली.

टँकर लॉबीच्या चौकशीची मागणी

टँकरचालक आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. कारखाने, व्यावसायिक प्रकल्प आणि जलतरण तलावांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियमन करून सर्वसामान्य नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करावा, असेही त्यांनी सांगितले.

सभागृहनेते गणेश खणकर यांनीही पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली. मात्र, संभाव्य एल निनो आणि पुढील वर्षीच्या पावसातील अनिश्चितता लक्षात घेता ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत राहील, अशा पद्धतीने नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्याची सूचना त्यांनी केली.

समाजवादी पक्षाचे गटनेते विजय उबाळे यांनी गोवंडी परिसरातील काही भागांत तब्बल ५० टक्क्यांपर्यंत पाणीकपात होत असल्याची तक्रार केली. बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनीही तलावांमध्ये मुबलक पाणीसाठा असल्याने १० टक्के पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली.
शेतकऱ्यांच्या पाण्याचाही विचार आवश्यक

महापौरांनीही पाणीकपात रद्द करण्याबाबत सकारात्मक विचार करण्याची गरज व्यक्त केली. मात्र, उपलब्ध पाणीसाठा ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरेल, अशा पद्धतीने नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील शेतकऱ्यांची पाण्याची गरज तसेच भविष्यातील पावसातील अनिश्चितता यांचाही विचार करावा लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, एल निनोचा संभाव्य प्रभाव, अनियमित पाऊस आणि बाष्पीभवन लक्षात घेता उपलब्ध तसेच राखीव पाणीसाठ्याचा आढावा घेणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पाणीकपातीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे राज्य सरकारकडून निर्णय होईपर्यंत मुंबईतील निवासी क्षेत्रातील १० टक्के आणि व्यावसायिक क्षेत्रातील २० टक्के पाणीकपात कायम राहणार आहे.

Related Articles

Back to top button