मुंबई

१० टक्के पाणीकपात ठेवली तरच २१ जुलैपर्यंत पुरणार पाणी; अन्यथा २० मे रोजीच तलाव होणार कोरडे

• स्थायी समितीत प्रशासनाचे सादरीकरण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये यंदा १३ लाख ९४ हजार दशलक्ष लिटर म्हणजेच ९६.३७ टक्के एवढा समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु, आगामी उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार की नाही, हे पाणीकपातीच्या निर्णयावरच अवलंबून असणार आहे. सध्या लागू असलेली १० टक्के पाणीकपात अशीच कायम ठेवल्यास हा साठा २१ जुलै २०२७ पर्यंत पुरेल; मात्र कपात मागे घेतल्यास अवघ्या २० मे २०२७ पर्यंतच तलावांतील साठा टिकेल, असा इशारा महापालिका प्रशासनाने स्थायी समितीत दिलेल्या सादरीकरणात दिला आहे.”

​मुंबईला दररोज सुमारे ४,६०० एमएलडी पाणी पुरवले जाते. मात्र, वितरणातील गळती, चोरी आणि बाष्पीभवन यामुळे तलावांमधून दररोज सुमारे ५,६७८ एमएलडी पाण्याची घट होत असल्याचे जल अभियंता विभागाने स्पष्ट केले. राज्य सरकारने ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंतच्या पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. १ एप्रिलपासून कपात लागू केल्यास साठा ३ जूनपर्यंत, तर १ मेपासून कपात केल्यास २९ जूनपर्यंत पुरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
​
मुंबईतील सुमारे ७ ते ८ हजार किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांमधील गळती आणि अनधिकृत जोडण्यांमुळे तब्बल ३४ टक्के पाणी ‘बिगरमहसुली’ जात असल्याचे पालिकेने मान्य केले. गेल्या आठ महिन्यांत गळतीच्या १७,९०६ तक्रारी आल्या असून ३,८०२ बेकायदेशीर नळ जोडण्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

​यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. गळती शोधण्यासाठी थर्मल तंत्रज्ञानाचा वापर करावा, टंचाईग्रस्त भागात आठवड्यातून दोन दिवस पुरेशा दाबाने पाणी द्यावे, विकासकांना प्रक्रियेचे पाणी वापरावे आणि हॉटेल व्यावसायिकांकडून थकबाकी वसूल करावी, अशा मागण्या लोकप्रतिनिधींनी केल्या.

​दरम्यान, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले की, गारगाई आणि डीसॅलिनेशन (खार्या पाण्याचे गोडे पाणी करणे) हे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत गळती नियंत्रण आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. पाणीकपातीबाबतचा अंतिम निर्णय आगामी काळातील हवामान आणि साठ्याचा आढावा घेऊनच घेतला जाईल.

Related Articles

Back to top button