मुंबई

Local train – लोकल प्रवास होणार गारेगार:पहिल्या २० गाड्या डिसेंबर २०२७पर्यंत,एकूण २३८ नव्या एसी लोकल दाखल होणार.

मुंबई : मुंबईकरांचा लोकल रेल्वेचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा यासाठी

मुंबई उपनगरीय रेल्वेत सुविधायुक्त तब्बल २३८ नव्या एसी लोकल दाखल करण्याची योजना अंमलात आणण्यात येत आहे. यातील पहिल्या २० एसी लोकल डिसेंबर २०२७पर्यंत रेल्वेच्या ताफ्यात येणार आहे. उर्वरित २१८ लोकल २०३०पर्यंत सेवेत आणण्याचे नियोजन आहे. या नव्या लोकलमध्ये सध्याच्या एसी लोकलच्या तुलनेत अधिक सुविधा देण्याचा प्रस्ताव आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीसोबत २३८ एसी रेकच्या खरेदी व उत्पादनासाठी सामंजस्य करार केला आहे. या रेकचे उत्पादन देशातील तीन कारखान्यांमध्ये करण्यात येणार आहे. त्यानुसार इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई येथे १२० रेक, रेल कोच फॅक्टरी, कपूरथळा येथे ७१ रेक आणि मॉडर्न कोच फॅक्टरी, रायबरेली येथे ४७ रेक तयार करण्यात येणार आहेत.

आसनांपासून चार्जिंगपर्यंत सुविधा
नव्या एसी लोकलमध्ये कुशनयुक्त आसने, प्रत्येक आसनाजवळ मोबाईल चार्जिंगची सुविधा, अद्ययावत एचव्हीएसी प्रणाली आणि प्रवाशांना आवश्यक माहिती देणाऱ्या स्क्रीनचा समावेश असणार आहे. त्यामुळे गर्दीच्या लोकल प्रवासात प्रवाशांना अधिक आराम मिळण्याची अपेक्षा आहे.
वेग वाढविण्यावरही भर नव्या एसी लोकलमध्ये वीजपुरवठ्याची क्षमता सध्याच्या ३३ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा विचार आहे. त्यामुळे लोकलच्या वेगात वाढ होण्यास मदत होऊ शकते. तसेच स्थानकांवर दरवाजे उघडणे आणि बंद होण्यासाठी लागणारा वेळ भरून काढण्यासही या सुधारणेचा फायदा होण्याची शक्यता आहे.

एसी यंत्रणेतही सुधारणा
प्रवाशांना अधिक प्रभावी वातानुकूलित सुविधा मिळावी यासाठी एसी प्रणालीमध्येही बदल प्रस्तावित आहेत. सध्याच्या १५ टन क्षमतेच्या युनिटऐवजी प्रत्येक डब्यात २५ टन क्षमतेची दोन युनिट्स बसविण्याचा विचार आहे. त्यामुळे मुंबईच्या उष्ण आणि दमट हवामानात प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button