मुंबई

MUMBAI POLUTION: वायू प्रदूषण रोखण्यासाठी नेमलेले भरारी पथक कुचकामी;

स्थायी समितीत सदस्य आक्रमक

मुंबई, मुंबईतील बांधकामांच्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या सेन्सर आधारित हवेच्या गुणवत्तेच्या मॉनिटर्सचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या ११.२८ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला बुधवारी महापालिकेच्या स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली.

मात्र, या मंजुरीदरम्यान शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने हाती घेतलेल्या उपाययोजनांवर सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. विशेषतः प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने नेमलेली भरारी पथके पूर्णपणे कुचकामी ठरल्याचे बैठकीत उघड झाले.

मुंबईतील वाढत्या धूळ आणि वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पालिकेने बांधकामांच्या ठिकाणी धूळ नियंत्रण नियमावली, रस्त्यांची नियमित स्वच्छता, पाण्याचे फवारे मारणे तसेच उल्लंघनांवर नजर ठेवण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. परंतु, एवढी मोठी यंत्रणा उभी करूनही शहरातील हवेच्या गुणवत्तेत अपेक्षित सुधारणा का झाली नाही आणि प्रदूषण कमी होत नसेल तर अशा पथकांचा उपयोग काय, असा थेट सवाल सदस्यांनी उपस्थित केला.

या बैठकीत शिवसेनेचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत थर्ड पार्टी ऑडिटच्या वेळी प्रत्यक्ष तपासणीत मशिन्स बंद ठेवल्या जातात अथवा सर्व काही सामान्य आहे अशा पद्धतीने मशिन्स सेट केल्या जातात, असा धक्कादायक दावा केला. त्यामुळे या तपासणीच्या पारदर्शकतेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह लावले. तर भाजपच्या नगरसेविका प्रीती सातम यांनी ही भरारी पथके प्रत्यक्षात काय कारवाई करत आहेत, याचा सविस्तर अहवाल सभागृहासमोर ठेवण्याची मागणी केली.

तर, प्रदूषित हवेमुळे मुंबई शहर आता क्षयरोगाचे केंद्र बनत चालले असून गंभीर परिस्थिती ओढवल्यानंतर तब्बल दीड वर्षाने पालिकेला थर्ड पार्टी ऑडिटची जाग आली आहे, अशी टीका काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी केली.

बांधकाम साईट्सवर नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याने पालिका यंत्रणेसोबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळासारख्या नियामक संस्थेला प्रत्यक्ष मोहिमेत सहभागी करून घेणे गरजेचे असल्याचे अमेय घोले यांनी सुचवले.

या सर्व आरोपांवर खुलासा करताना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले की, शहरातील ३ हजारांहून अधिक बांधकाम स्थळांवर सेन्सर आधारित हवा गुणवत्ता तपासणी मॉनिटर्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. २०२५ पासून अशा सेन्सर्सची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आली असून, हे यंत्र केवळ धूळफेक ठरू नये आणि त्यांची कार्यक्षमता तपासावी यासाठीच थर्ड पार्टी ऑडिटचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी ‘मे. महाबळ एन्व्हायरो इंजिनियर्स प्रा. लि.

’ या संस्थेची निवड करण्यात आली असून, पुढील तीन वर्षांच्या कालावधीत पावसाळा वगळून ७५० दिवसांत सुमारे ९ हजार सेन्सर मॉनिटर्सची प्रत्यक्ष तपासणी पूर्ण केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Related Articles

Back to top button