मुंबई

चोरी गेलेला १.७३ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परतउत्तर परिमंडळ-२ पोलिसांची कारवाई;

मुंबई: उत्तर परिमंडळ-२ अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांच्या तपासादरम्यान हस्तगत करण्यात आलेला तब्बल १ कोटी ७३ लाख १ हजार ५५४ रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी मूळ मालकांना परत केला. कांदिवली पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात पोलीस उप आयुक्त संदीप घुगे यांच्या हस्ते संबंधित फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला.

या मुद्देमालामध्ये ९० लाख ४४ हजार रुपये किमतीचे ६८४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ५१ लाख २० हजार रुपये किमतीचे ३४८ मोबाईल फोन, २२ लाख ८७ हजार ५५४ रुपयांची रोकड व ऑनलाइन तक्रारींमधून परत मिळवलेली रक्कम, तसेच ८ लाख ५० हजार रुपये किमतीची १३ दुचाकी आणि एका ऑटो रिक्षाचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर परिमंडळ-२ मधील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल गुन्ह्यांचा तपास करताना हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. चोरीस गेलेले अथवा हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी सीईआयआर पोर्टलचीही मदत घेण्यात आली. सीईआयआरच्या माध्यमातून एकूण ३४८ मोबाईल फोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

मोबाईल फोनमध्ये कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२०, मालवणीतील ८२, एम.एच.बी. कॉलनीतील ६५, बोरीवलीतील ६०, चारकोपमधील १९ आणि गोराईतील २ मोबाईलचा समावेश आहे.



तसेच, विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत झालेली ८ लाख ५२ हजार ५८६ रुपयांची रोख रक्कम आणि एनसीआरपीवरील ऑनलाइन तक्रारींच्या माध्यमातून मिळवलेली १४ लाख ३४ हजार ९६८ रुपयांची रक्कम संबंधित नागरिकांना परत करण्यात आली.

वाहनांच्या बाबतीत कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ८, बोरीवलीतून ३, एम.एच.बी. कॉलनीतून २ आणि गोराईतून १ अशा एकूण १४ वाहनांचा समावेश आहे.
उत्तर परिमंडळ-२ अंतर्गत कार्यरत पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी विविध गुन्ह्यांचा तपास करून मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे नागरिकांना त्यांची मालमत्ता परत मिळाली. या कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उप आयुक्त संदीप घुगे तसेच संबंधित विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Related Articles

Back to top button