मुंबईत प्लास्टिकबंदीची मोहीम आणखी तीव्र

मुंबई : सणासुदीच्या काळात प्लास्टिकचा वापर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने प्लास्टिकबंदीची मोहीम आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे केवळ फेरीवाले आणि दुकानदारांवरच नव्हे, तर प्लास्टिकचा साठा करणाऱ्या गोदामधारकांवरही कारवाई केली जाणार आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्रतिबंधित प्लास्टिकची विक्री, साठवणूक आणि वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी पालिकेकडून नियमित तपासणी आणि धडक कारवाई केली जात आहे. पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास ५ हजार रुपये, दुसऱ्यांदा १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा २५ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. कारवाई करूनही काही ठिकाणी प्लास्टिकचा वापर सुरूच असल्याचे निदर्शनास आल्याने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
एप्रिल २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत पालिकेने केलेल्या कारवाईत तब्बल ७ हजार ५०५ किलो प्लास्टिक आणि थर्माकोल जप्त करण्यात आले आहे. या कारवाईतून १ कोटी ३० लाख ९५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी आता विक्रीपासून साठवणुकीपर्यंत संपूर्ण साखळीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
दरम्यान, प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागातील मनुष्यबळाची कमतरता मोठे आव्हान ठरत आहे. विभागातील १२७ पदांपैकी तब्बल ७२ पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर कारवाईचा अतिरिक्त ताण पडत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी महापालिकेच्या इतर विभागांतील कर्मचाऱ्यांची मदत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सणासुदीच्या काळात बाजारपेठा, दुकाने, फेरीवाले आणि गोदामांमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर वाढू नये, यासाठी तपासणी मोहीम अधिक व्यापक करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्याची कारवाईही सुरू राहणार आहे.



