मुंबई

गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेची जय्यत तयारी ६७ नैसर्गिक, तर ३८३ कृत्रिम विसर्जन स्थळांवर व्यवस्था; १,१३२ जीवरक्षक तैनात.

मनोज कुळकर्णी,
मुंबई :गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षितता, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक व्यवस्थेला महापालिकेने प्राधान्य दिले आहे. आज दीड दिवसाच्या गणरायाच विसर्जन होणार आणि पासून पालिकेची आणि सुरक्षा संबंधित यंत्रणांची कसोटी सुरू होणार. यंदा मुंबईत ६७ नैसर्गिक आणि ३८३ कृत्रिम विसर्जन स्थळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

विसर्जन स्थळांवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी १,१३२ जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी १० मोटरबोटी, २३ जर्मन तराफे आणि ३४ क्रेन सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तसेच तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी ८५ रुग्णवाहिका आणि २३६ प्रथमोपचार केंद्रे उपलब्ध असतील. गर्दी आणि परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ७५ निरीक्षण मनोरे आणि २२८ नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहेत.

रात्रीच्या विसर्जनावेळी पुरेसा प्रकाश उपलब्ध राहावा यासाठी महापालिकेकडून ६,०५२ फ्लडलाइट आणि सर्चलाइटची व्यवस्था करण्यात आली आहे. निर्माल्य नदी, समुद्र किंवा तलावात विसर्जित होऊ नये यासाठी ४९८ निर्माल्य कलश आणि ३२६ वाहने तैनात केली जाणार आहेत.
विसर्जनानंतर परिसरात तातडीने स्वच्छता करण्यासाठी ३ हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. तसेच पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (POP) मूर्तींसाठी स्वतंत्र उचल आणि वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये ७६ हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. यंदाही कृत्रिम तलावांचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची शक्यता असून, त्यानुसार महापालिकेने अतिरिक्त व्यवस्था केली आहे.

गणेशभक्तांनी महापालिकेच्या सूचनांचे पालन करावे, गर्दीच्या ठिकाणी काळजी घ्यावी आणि निर्माल्य तसेच मूर्तींचे विसर्जन महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणीच करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button