मुंबई

मुंबई मनपा आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडून गिरगाव, दादर चौपाटीची पाहणी; सुरक्षा आणि पर्यावरण संवर्धनावरही भर.

मुंबई: गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने विसर्जनस्थळी गणेशभक्तांच्या सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. विसर्जनस्थळी पुरेसे तराफे, निरीक्षण मनोरे, निर्माल्य कलश, स्टील प्लेट्स, योग्य प्रकाशव्यवस्था, पिण्याचे पाणी आणि प्रशिक्षित जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.

आयुक्त भिडे यांनी बुधवारी स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) आणि दादर चौपाटी येथील विसर्जनस्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध सेवा-सुविधांचा आढावा घेतला. पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र फिरती शौचालये उपलब्ध करून देण्यासह नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

विसर्जनस्थळी निर्माल्य कलशांची संख्या वाढवून नागरिकांनी निर्माल्य समुद्रात किंवा परिसरात न टाकता केवळ कलशांमध्येच जमा करावे, यासाठी प्रभावी जनजागृती करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. संकलित निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याची सूचनाही भिडे यांनी केली.

लहान गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी जास्तीत जास्त कृत्रिम तलाव उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला असून, मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी गणेशभक्तांना क्रेनची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गिरगाव आणि दादर चौपाटी परिसर स्वच्छ व कचरामुक्त ठेवण्यासाठीही आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

विसर्जन प्रक्रिया सुरक्षित, सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही आयुक्त भिडे यांनी स्पष्ट केले.

या पाहणी दौऱ्यात उपायुक्त प्रशांत गायकवाड, उपायुक्त चंदा जाधव, उपायुक्त तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे, डी विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष साळुंखे, जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश देसाई यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button