मुंबई

गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज, ३८३ कृत्रिम विसर्जन तलावांसह ६७ नैसर्गिक विसर्जन स्थळे, २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी, तैनात

मुंबई : गणेशमूर्ती विसर्जनासाठी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. यंदा मुंबईत ३८३ कृत्रिम विसर्जन तलावांसह ६७ नैसर्गिक विसर्जन स्थळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

विसर्जनाची प्रक्रिया सुरळीत आणि सुरक्षित पार पडावी यासाठी २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी, १ हजार १३२ जीवरक्षक, ८५ रुग्णवाहिका, १० मोटरबोट, २३ जर्मन तराफे आणि ३४ क्रेन तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय ४९८ निर्माल्य कलश, ३२६ निर्माल्य डंपर, २६१ स्वागत कक्ष, २२८ नियंत्रण कक्ष आणि ७५ निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत.

मुंबईतील प्रमुख विसर्जन स्थळांपैकी गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, पवई तलाव, वरळी आणि दादर समुद्रकिनारा येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटीवर १२ कृत्रिम तलावांसह मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

यंदा पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेने ‘एक गणपती, एक झाड’ हा उपक्रमही हाती घेतला आहे. विसर्जित होणाऱ्या गणेशमूर्तींच्या संख्येइतकी झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तसेच शाडू मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी मूर्तिकारांना ९४० मेट्रिक टनांहून अधिक शाडू माती आणि २५ हजार ४०० लिटर पर्यावरणपूरक रंग विनामूल्य वितरित करण्यात आले आहेत.

विसर्जन मार्गांवरील २८१ ठिकाणच्या अडथळा निर्माण करणाऱ्या केबल्स हटवण्यात आल्या असून, ५०६ रस्त्यांवरील ४ हजार २७९ खड्डे आणि १७१ ड्रेनेज कव्हर्सची दुरुस्ती करण्यात आली आहे. ५१५ ठिकाणी वृक्षछाटणीची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत.

दरम्यान, समुद्रकिनाऱ्यावर ब्ल्यू बटन जेलीफिश आणि स्टिंग रे यांचा वावर आढळत असल्याने नागरिकांनी समुद्रात उतरताना काळजी घ्यावी आणि महापालिका व पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध पद्धतीने गणेश विसर्जन पार पाडण्यासाठी नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Back to top button