मेट्रो स्थानकांभोवती अंधार; प्रकाशव्यवस्था तातडीने सुधारण्याची मागणी

मुंबई: बृहन्मुंबईतील विविध मेट्रो रेल्वे स्थानकांच्या परिसरात रात्रीच्या वेळी अपुरी प्रकाशव्यवस्था असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रश्न गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे नमूद करत महापालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
खणकर यांनी आयुक्तांना पत्र देऊन बृहन्मुंबईतील सर्व मेट्रो स्थानकांच्या परिसराची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी पुरेशी, सुरक्षित आणि कायमस्वरूपी प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
मेट्रो स्थानकांकडे जाणारे रस्ते, पदपथ, पादचारी मार्ग, प्रवेश आणि निर्गमन मार्ग तसेच स्थानकांच्या आजूबाजूच्या परिसरात गरजेनुसार हायमास्ट, एलईडी स्ट्रीट लाईट आणि आधुनिक प्रकाशयंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, सध्या अस्तित्वात असलेल्या दिव्यांची नियमित तपासणी, देखभाल आणि दुरुस्ती करून ते कायमस्वरूपी कार्यरत राहतील, याची दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
“मुंबईकरांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. मेट्रो स्थानकांवर रात्रीच्या वेळीही नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे स्थानक परिसरातील अंधाराची समस्या तातडीने दूर करून नागरिकांना पुरेशी आणि सुरक्षित प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून द्यावी,” अशी मागणी गणेश खणकर यांनी केली.
महापालिका प्रशासनाने मेट्रो स्थानकांखालील तसेच लगतच्या संपूर्ण परिसराची पाहणी करून आवश्यकतेनुसार प्रकाशव्यवस्थेचे नियोजन करावे आणि याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असेही खणकर यांनी पत्रात नमूद केले आहे.



