मुंबई

भटक्या श्वानांवर निर्बीजीकरणानंतर थेट निवारा केंद्रात रवानगी

मुंबई : भटक्या श्वानांमुळे होणारा त्रास आणि मानव-श्वान संघर्ष रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. परिसरातून पकडलेल्या भटक्या श्वानांवर निर्बीजीकरण आणि लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडण्याऐवजी थेट निवारा केंद्रात ठेवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार श्वानांच्या दोन वर्षांच्या संगोपनासाठी तब्बल १३ कोटी ३५ लाख १७ हजार रुपये खर्च अपेक्षित असून, यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर सादर करण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून ही कार्यवाही करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या प्राणी जन्म नियंत्रण नियमांबरोबरच भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

महापालिकेकडे सध्या स्वतःचे कायमस्वरूपी निवारा केंद्र उपलब्ध नसल्याने श्वानांच्या संगोपनासाठी खासगी संस्थेची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने ई-निविदा प्रक्रिया राबवली होती. या प्रक्रियेत ‘जेनिस शिफ्ट अॅनिमल वेल्फेअर ट्रस्ट’ या संस्थेने तांत्रिक मूल्यमापनात १०० पैकी १०० गुण मिळवले. तसेच प्रतिश्वान प्रतिदिन १५५ रुपये हा सर्वांत कमी दर सादर केल्याने या संस्थेची निवड करण्यात आली आहे.

एक हजार श्वानांच्या संगोपनासाठी वर्षाला सुमारे ५ कोटी ६५ लाख ७५ हजार रुपये, तर दोन वर्षांसाठी वस्तू व सेवा करासह सुमारे १३ कोटी ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या श्वानांना निवारा, आवश्यक देखभाल तसेच संबंधित नियमांनुसार संगोपनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Related Articles

Back to top button