मुंबईत वन्यवाणी वन्यजीव महोत्सवाला सुरुवात

महापौर रितू तावडेच्या हस्ते शुभारंभ; निवासस्थानांच्या संवर्धनातून वन्यजीव संरक्षणाचा संदेश
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात.राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘वन्यवाणी वन्यजीव महोत्सव २०२६’ला शुक्रवारी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते सुरुवात झाली. ‘निवासस्थानांना जोडणे, वन्यजीवांची भरभराट’ या संकल्पनेवर आधारित या महोत्सवातून वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
महापालिकेच्या वतीने आणि वन्यवाणी फाउंडेशनच्या संकल्पनेतून व सहआयोजनातून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांसह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी आपुलकी आणि संवेदनशीलता निर्माण करणे, तसेच वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.

महोत्सवादरम्यान विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विशेष कार्यशाळा, माहिती प्रदर्शन, वन्यजीवांवरील माहितीपट आणि अभ्यासकांची व्याख्याने यांचा समावेश आहे. विविध स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरण क्षेत्रातील संस्थांच्या सहभागातून माहिती प्रदर्शनही उभारण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन, जेन गुडॉल इन्स्टिट्यूट, वाईल्डलाईफ कॉन्झर्व्हेशन सोसायटी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, सीड स्टोरीज, ग्रीन वर्क ट्रस्ट, सृष्टिज्ञान, गोदरेज, असर, क्लायमेट कल्चर कलेक्टिव्ह, अरेण्य, प्रोजेक्ट मुंबई आणि वनभाषी या संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत.

प्रदर्शनात पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनासाठी सहभागी संस्थांकडून करण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष कामाची माहिती छायाचित्रे, माहिती फलक आणि शास्त्रीय नमुन्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. विद्यार्थी, अभ्यासक आणि निसर्गप्रेमींनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर रितू तावडे यांनी केले.



