मुंबई

मुंबईत मलेरिया, ‘एच१एन१’च्या रुग्णसंख्येत वाढ

डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टो आणि कोविडच्या रुग्णसंख्येत घट; पालिकेची प्रतिबंधात्मक मोहीम तीव्र

मुंबई : पावसाळ्यात मुंबईत विविध संसर्गजन्य आजार वाढले आहेत.यावर्षी मलेरिया आणि एच१एन१च्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. जानेवारी ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीतील महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मुंबईत मलेरियाचे ८ हजार ७२३ रुग्ण आढळले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत ही संख्या ६ हजार २७७ होती. त्यामुळे यंदा मलेरियाच्या रुग्णसंख्येत २ हजार ४४६ रुग्णांची वाढ झाली आहे.

एच१एन१च्या रुग्णसंख्येतही मोठी वाढ झाली आहे. यंदा ५०७ रुग्ण आढळले असून, मागील वर्षी याच कालावधीत केवळ ८३ रुग्ण आढळले होते.
दरम्यान, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत यंदा घट झाली आहे. यंदा २ हजार ७२४ रुग्ण आढळले असून, मागील वर्षी ही संख्या २ हजार ६५६ होती. चिकनगुनियाचे रुग्ण ५४२ वरून ८०, लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण ५५८ वरून ३९०, गॅस्ट्रोचे रुग्ण ५ हजार ९८९ वरून ४ हजार ९९७, तर कोविड-१९चे रुग्ण १ हजार ११८ वरून १७८ झाले आहेत.

५ लाख ९४ हजार घरांचे सर्वेक्षण

संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत ५ लाख ९४ हजार २६९ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, २७ लाख ९३ हजार १९३ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच ३२ हजार ११४ रक्तनमुने संकलित करण्यात आले. या कालावधीत २८ आरोग्य शिबिरे घेण्यात आली असून, १ हजार ८४२ नागरिकांना लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक उपचार देण्यात आले.

११ हजार ७९६ ठिकाणी एडीस डासांची उत्पत्ती

मलेरिया नियंत्रणासाठी २१ हजार ६५५ डास उत्पत्तीस्थळांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ हजार ३६७ ठिकाणी अनोफिलीस डासांची उत्पत्ती आढळली. तर डेंग्यू नियंत्रणासाठी ४ लाख ६८ हजार ९९३ उत्पत्तीस्थळांची तपासणी करण्यात आली. यापैकी ११ हजार ७९६ ठिकाणी एडीस डासांची उत्पत्ती आढळून आली.

१,३९० उंदरांवर नियंत्रण

१ ते १५ ऑगस्टदरम्यान महापालिकेच्या पथकांकडून उंदरांवरही नियंत्रणाची कारवाई करण्यात आली. पिंजऱ्याद्वारे ८३० उंदीर पकडण्यात आले, तर मूषकनाशकाचा वापर करून ५६० उंदरांवर नियंत्रण मिळवण्यात आले. अशा प्रकारे एकूण १ हजार ३९० उंदरांवर कारवाई करण्यात आली.

Related Articles

Back to top button