कृत्रिम तलावांत ९७.२७ टक्के गणेशमूर्तींचे विसर्जन

मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या आवाहनाला यंदा गणेशभक्तांनी मोठा प्रतिसाद दिला. मुंबईत यंदा विसर्जित करण्यात आलेल्या एकूण १ लाख ९७ हजार ३८२ गणेशमूर्तींपैकी १ लाख ९२ हजार २३७, म्हणजेच ९७.२७ टक्के मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. महापालिकेने शहरात उभारलेल्या ३८३ कृत्रिम तलावांमध्ये हे विसर्जन झाले.
महापालिकेच्या माहितीनुसार, सहा फुटांपर्यंतच्या १ लाख ९२ हजार २३७ मूर्तींचे कृत्रिम तलावांत विसर्जन करण्यात आले. यामध्ये १ लाख २२ हजार ३९१ पीओपी, तर ६९ हजार ८४६ शाडू मातीच्या मूर्तींचा समावेश आहे. सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या ५ हजार ३८२ मूर्तींचे ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवर विसर्जन करण्यात आले. यामध्ये ५ हजार २५९ पीओपी आणि १२३ शाडू मातीच्या मूर्ती होत्या.
नैसर्गिक जलस्रोतांवरील विसर्जनाचा पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी महापालिकेने यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढवून नागरिकांना घराजवळच विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मोकळे भूखंड, उद्याने आणि मैदानांमध्ये हे तलाव उभारण्यात आले होते. त्यासोबतच महापालिकेने पर्यावरणपूरक विसर्जनाबाबत जनजागृतीही केली. त्यामुळे विविध चौपाट्यांवरील विसर्जनाची गर्दी कमी झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
पर्यावरणपूरक मूर्तींच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने मूर्तिकारांना ९४० मेट्रिक टनांहून अधिक शाडू माती विनामूल्य उपलब्ध करून दिली. तसेच पर्यावरणपूरक रंगांसाठी २५ हजार ४०० लिटर रंगही विनामूल्य देण्यात आला.
विसर्जन प्रक्रिया सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी महापालिकेने २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. कृत्रिम तलाव, नैसर्गिक विसर्जनस्थळे, सुरक्षा व्यवस्था, निर्माल्य संकलन तसेच विसर्जनोत्तर मूर्ती साहित्याचे संकलन आणि व्यवस्थापनासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या.
दरम्यान, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेतल्याबद्दल महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी गणेशभक्त आणि गणेश मंडळांचे आभार मानले.



