बनावट APK फाईल्सचा ‘कारखाना’ उघड; सॉफ्टवेअर डेव्हलपरला अटक…

मुंबई : बनावट APK फाईल्सच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसह नागरिकांची सायबर फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एका सॉफ्टवेअर डेव्हलपरला मुंबई गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातून अटक केली आहे. आरोपीने तब्बल २,८०५ दुर्भावनापूर्ण APK फाईल्स तयार करून त्या विविध सायबर गुन्हेगारी टोळ्यांना विकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या APK फाईल्सच्या माध्यमातून देशभरातील तब्बल ९,६७३ नागरिकांना लक्ष्य करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा तपास एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या फसवणुकीनंतर सुरू झाला. १३ ऑगस्ट २०२६ रोजी एका व्यक्तीने संबंधित ज्येष्ठ नागरिकाला फोन करून आपण बँक ऑफ इंडियाचा वरिष्ठ व्यवस्थापक दिनेश कुमार असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिक कार्ड मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्याने व्हॉट्सॲपवर ‘Senior Citizen Card Verification.apk’ नावाची फाईल पाठवली. या फाईलच्या माध्यमातून वैयक्तिक तसेच डेबिट कार्डची माहिती मिळवल्यानंतर त्यांच्या खात्यातून तब्बल ५ लाख ६२ हजार रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली.
या प्रकरणी बायकुल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागानेही या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
APKच्या तांत्रिक विश्लेषणातून आरोपीपर्यंत पोहोच
फसवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या APK फाईलचे गुन्हे शाखेने सखोल तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्य प्रदेशातील आरोपीच्या कार्यालयाचा शोध घेतला. तेथे छापा टाकून ३६ वर्षीय सॉफ्टवेअर डेव्हलपरला अटक करण्यात आली.
छाप्यात आरोपीकडून एक पेनड्राइव्ह, सीपीयू, तीन हार्ड डिस्क, एक वाय-फाय राउटर आणि तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. प्राथमिक तांत्रिक तपासात आरोपी विविध सर्व्हर सेवा पुरवठादार कंपन्यांचे सर्व्हर वापरत असल्याचे समोर आले आहे.
२,८०५ APK; ९,६७३ नागरिक लक्ष्य
तपासात आरोपीने तयार केलेल्या २,८०५ दुर्भावनापूर्ण APK फाईल्स विविध सायबर गुन्हेगारी टोळ्यांना विकल्याचे समोर आले आहे. या फाईल्सचा वापर करून देशभरात ९,६७३ नागरिकांना लक्ष्य करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर दाखल तक्रारींच्या तपासात देशभरातून १,०७४, महाराष्ट्रातून १४३ आणि मुंबईतून ३६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींमध्ये अंदाजे १५.७५ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
आतापर्यंतच्या तपासात देशभरातील ८८, महाराष्ट्रातील ८ आणि मुंबईतील ५ प्रकरणांचा संबंध उघडकीस आला आहे. आरोपीच्या तांत्रिक उपकरणांचे आणि सर्व्हरशी संबंधित माहितीचे पुढील विश्लेषण सुरू असून, सायबर फसवणुकीची आणखी प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय आणि पोलीस उपआयुक्त (डिस्क्लोजर, गुन्हे शाखा) राज तिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सहायक पोलीस आयुक्त सदानंद राणे आणि प्रॉपर्टी सेलचे प्रभारी पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, सहायक निरीक्षक सचिन जाधव, सहायक निरीक्षक प्रकाश गवळी तसेच पश्चिम सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी अमित करपटे, विश्वनाथ पोल, योगेश गाढवे, निधी नाईक आणि मयूर थोरात यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.



