पदवी-परवाना नसतानाही रुग्णांवर उपचार; मुंबईत १० बोगस डॉक्टरांवर कारवाई

मुंबई : वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही वैध पदवी किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी नसतानाही डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांवर उपचार करणाऱ्या १० बोगस डॉक्टरांवर मुंबई गुन्हे शाखेने कारवाई केली आहे.
भांडुप, जोगेश्वरी, बोरीवली, दहिसर आणि मानखुर्द परिसरातील सात क्लिनिकवर छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे २ लाख २० हजार रुपये किमतीची औषधे आणि वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले.
गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ला मुंबईतील काही भागांत बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार केले जात असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली होती. हे डॉक्टर विशेषतः गुप्तरोगांसह विविध आजारांवर अॅलोपॅथी, आयुर्वेदिक आणि युनानी पद्धतीची औषधे देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने बृहन्मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वेगवेगळ्या दिवशी संतोष हेल्थ क्लिनिक आणि विनायक हेल्थ क्लिनिक (भांडुप), हमदम दवाखाना आणि कोहिनूर दवाखाना (जोगेश्वरी), अंकुश आयुर्वेदिक दवाखाना (बोरीवली), दीपक हर्बल हेल्थ केअर क्लिनिक (दहिसर) आणि समर आयुर्वेदिक दवाखाना (मानखुर्द) येथे छापे टाकले.
या सात ठिकाणी एकूण १० जण वैद्यकीय क्षेत्रातील वैध पदवी किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी नसतानाही डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करताना आढळून आले. काही ठिकाणी वैधता संपलेली युनानी आणि आयुर्वेदिक औषधेही विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले.
पोलिसांनी या कारवाईत विविध प्रकारच्या औषधांच्या बाटल्या, सिरिंज, अँटिबायोटिक गोळ्या आणि अन्य वैद्यकीय साहित्य असा सुमारे २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अॅक्ट, १९६१ मधील कलम ३३ आणि ३६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास गुन्हे शाखेच्या कक्ष ७ मार्फत सुरू आहे.



