मुंबई

रविवारच्या अपघातानंतर कोस्टल रोडवर आता डिजिटल पाळत!


वेगमर्यादा, लेन शिस्तभंग आणि ड्रंक अँड ड्राइव्ह रोखण्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे बसवणार

मुंबई : रविवारच्या भीषण अपघातानंतर मुंबईचा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड पुन्हा एकदा वाहनांच्या अनियंत्रित वेगामुळे चर्चेत आला आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन, लेनची शिस्त न पाळणे आणि ड्रंक अँड ड्राइव्हसारख्या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिस, वाहतूक पोलिस आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली.

या बैठकीत कोस्टल रोडवर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे बसवून वाहनांच्या वेगावर डिजिटल पाळत ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासोबतच वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी या यंत्रणेचा वापर करण्याचे नियोजन आहे.

शेकडो कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या सागरी मार्गावर सध्या मात्र अत्यंत मोजके सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. मरीन ड्राइव्ह, वरळी, हाजी अली आणि वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणाऱ्या या मार्गावर सद्यःस्थितीत केवळ सात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असल्याची माहिती आहे.
मरीन ड्राइव्हहून वरळीकडे जाताना भुयारी मार्गातील एका लेनवर तीन, तर अमरसन्स इंटरचेंज परिसरात चार कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र, याच मार्गावरील दुसऱ्या लेनवर एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्न उपस्थित होत आहेत.

कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वीच मोठे सीसीटीव्ही नेटवर्क उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र, त्यासाठी केवळ आठ कोटी रुपयांचे बजेट मंजूर झाल्याने मर्यादित संख्येनेच कॅमेरे बसवता आले. आता रविवारच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर कोस्टल रोडवरील कॅमेरा यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button