मुंबई

CJP Jail Bharo: पोलिसांचा नकार, आंदोलनावर CJP ठाम; कार्यकर्त्यांसाठी वसईचे वकील मैदानात

मुंबई : गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवाजी पार्क येथे CJP अर्थात कॉकरोच जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन करण्यावर CJP ठाम असून, कार्यकर्त्यांनी ‘जेल भरो’ची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर वसईतील वकिलांनी CJP कार्यकर्त्यांना कायदेशीर मदत देण्याची तयारी दर्शविली आहे.

CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध मागण्या CJPकडून करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, शिवाजी पार्क परिसरात आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. उच्च न्यायालयाचे निर्देश, शिवाजी पार्क परिसरातील नियम, वाहतुकीवर होणारा परिणाम तसेच कायदा-सुव्यवस्थवर होणारा परिणाम यांचा विचार करता पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याचे सांगण्यात येत आहे.

परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन मागे न घेता CJPने ‘जेल भरो’ची भूमिका घेतली आहे. आज शिवाजी पार्क परिसरात आंदोलनकर्ते आणि पोलिसांमधील घडामोडी होतात याकडे लक्ष लागले आहे.

गुन्हे दाखल झाल्यास मुंबईत येण्याची तयारी

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वसईतील वकिलांनी CJP कार्यकर्त्यांच्या कायदेशीर मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यास त्यांच्या बाजूने मुंबईत येऊन विनामूल्य कायदेशीर लढा देण्याची तयारी ज्येष्ठ वकील दिगंबर देसाई यांनी दर्शविली आहे.

शांततामय आंदोलन हा लोकशाही व्यवस्थेतील नागरिकांचा अधिकार असल्याची भूमिका वकिलांनी मांडली आहे. आंदोलनासाठी परवानगी घेण्याचा नियम असला तरी त्याची अंमलबजावणी सर्वांसाठी समान असावी, असेही वकिलांचे म्हणणे आहे.

दरम्यान, शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आल्याचे आणि बॅरिकेडिंग करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गांधी जयंतीच्या दिवशी होणाऱ्या या आंदोलनाकडे मुंबईसह देशाचे लक्ष लागले आहे.

पोलिसांचा परवानगी नाकारण्याचा निर्णय, CJPची ‘जेल भरो’ची भूमिका आणि वसईतील वकिलांची कायदेशीर मदतीची तयारी यामुळे २ ऑक्टोबरला शिवाजी पार्कमध्ये नेमकी काय परिस्थिती निर्माण होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Back to top button