मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक; लोकलच्या वेळापत्रकात बदल

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी विविध यांत्रिकी कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.उद्या मुंबईकरांना घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडाव लागणार आहे.अन्यथा गर्दीचा सामना करावा लागू शकतो.
रविवार, २७ सप्टेंबर रोजी मेन लाईन आणि हार्बर लाईनवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत, तर हार्बर लाईनवर कुर्ला ते वाशीदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मेन लाईनवरील ब्लॉकदरम्यान सीएसएमटीहून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल माटुंगा ते मुलुंडदरम्यान निर्धारित स्थानकांवर थांबतील. ठाण्यापुढे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड येथे पुन्हा जलद मार्गावर आणल्या जातील. त्यामुळे प्रवाशांना गंतव्यस्थानी पोहोचण्यास सुमारे १५ मिनिटांचा विलंब होणार आहे.
ठाण्याहून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ या वेळेत सुटणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल माटुंगा येथे पुन्हा जलद मार्गावर आणल्या जातील. त्यांनाही सुमारे १५ मिनिटांचा विलंब अपेक्षित आहे. तसेच, दुपारी १.४८ वाजता खोपोलीहून सुटणारी खोपोली-सीएसएमटी लोकल आता दुपारी २.०६ वाजता सुटणार आहे.
हार्बरवरील काही लोकल रद्द
हार्बर लाईनवरील ब्लॉकमुळे सीएसएमटीहून वाशी, बेलापूर आणि पनवेलच्या दिशेने सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या कालावधीत सुटणाऱ्या लोकल रद्द राहतील. तसेच पनवेल, बेलापूर आणि वाशीहून सीएसएमटीच्या दिशेने सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ या वेळेत धावणाऱ्या लोकलही रद्द करण्यात येणार आहेत.
प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉकच्या काळात सीएसएमटी-कुर्ला-सीएसएमटी आणि पनवेल-वाशी-पनवेलदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. ट्रान्स-हार्बर आणि उरण पोर्ट मार्गावरील सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार सुरू राहतील. तसेच सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळमार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
पायाभूत सुविधांची देखभाल आणि प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने हा मेगा ब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले असून, प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.



