काँक्रिट रस्त्यांआधी जलवाहिन्यांची कामे पूर्ण

मुंबईत दोन वर्षांत २३५ किमी नव्या जलवाहिन्या
मुंबई : काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यांचे भविष्यात पुन्हा खोदकाम करण्याची वेळ येऊ नये, यासाठी मुंबई महापालिकेच्या जलअभियांत्रिकी विभागाने नव्या जलवाहिन्या टाकण्यासह जुन्या जलवाहिन्या बदलण्याचा वेग वाढविला आहे. २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन आर्थिक वर्षांत मुंबईत तब्बल २३५.९२ किमी नव्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये २०२४-२५ मध्ये १३५.२५ किमी, तर २०२५-२६ मध्ये १००.६७ किमी जलवाहिन्यांचा समावेश आहे.
मुंबईतील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले काँक्रिटीकरण हे नव्या जलवाहिन्या टाकण्यामागील प्रमुख कारण ठरत आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यापूर्वी संबंधित भागातील भूमिगत पायाभूत सुविधांची आवश्यक कामे पूर्ण करण्यावर महापालिकेचा भर आहे. त्यामुळे काँक्रिटचे रस्ते तयार झाल्यानंतर जलवाहिन्यांसाठी पुन्हा खोदकाम करण्याची वेळ येऊ नये, यासाठी आधीच जलवाहिन्या बदलण्याचे किंवा नव्या वाहिन्या टाकण्याचे काम करण्यात येत आहे.
जलवाहिन्या टाकण्याचा वेग वाढला
मुंबईत २०२२-२३ मध्ये ८४.३८ किमी आणि २०२३-२४ मध्ये ७४.२५ किमी नव्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर २०२४-२५ मध्ये हे काम वाढून १३५.२५ किमीपर्यंत पोहोचले. २०२५-२६ मध्ये आणखी १००.६७ किमी जलवाहिन्या टाकण्यात आल्या. तर चालू २०२६-२७ आर्थिक वर्षात ऑगस्ट २०२६ अखेरपर्यंत २५.९१ किमी जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत.
जुन्या जलवाहिन्यांमुळे गळतीची समस्या
मुंबईतील अनेक जुन्या जलवाहिन्या रस्त्यांच्या खाली आहेत. रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर या जलवाहिन्यांची नेमकी दिशा शोधणे, गळतीचे ठिकाण निश्चित करणे आणि दुरुस्ती करणे तुलनेने अधिक कठीण होते. त्यामुळे जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन वाहिन्या टाकल्यास भविष्यातील गळतीच्या तक्रारी कमी होण्यासोबतच रस्त्यांचे वारंवार होणारे खोदकामही टाळता येणार आहे.
“काँक्रिटीकरण करण्यापूर्वी आवश्यक भूमिगत पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यावर महापालिकेचा भर आहे. त्यामुळे नव्याने बांधलेल्या काँक्रिट रस्त्यांचे पुन्हा खोदकाम करण्याची वेळ येऊ नये, यासाठी जलवाहिन्या बदलण्याची किंवा नव्या जलवाहिन्या टाकण्याची कामे आधीच केली जात आहेत,” असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.



