मुंबई

मुंबईत घाण आणि कचरा टाकणाऱ्यावर कारवाही

पालिकेकडून १८.७० लाखांचा दंड वसूल

मुंबई :
मुंबई स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहे.आपल्या आसपासच्या परिसरात अस्वच्छता पसरवणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, ओला-सुका कचरा वेगळा न करणे तसेच बांधकाम व डेब्रिज अनधिकृतपणे टाकणे किंवा त् वाहतूक करणे, अशा विविध प्रकारच्या नियमभंग करणाऱ्यांवर ही कारवाई करत सप्टेंबर महिन्यात पालिकेने १८ लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

परिसर स्वच्छ न ठेवल्याच्या ४४३ प्रकरणांत सात लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्याची अनधिकृत वाहतूक किंवा विल्हेवाट लावल्याच्या ३५ प्रकरणांत पाच लाख ९८ हजार २५० रुपये दंड ठोठावण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याच्या ३३० प्रकरणांत एक लाख ६७ हजार रुपये, तर ओला-सुका कचरा वेगळा न करता दिल्याच्या १८४ प्रकरणांत एक लाख ६८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

याशिवाय उघड्यावर थुंकणे, लघवी करणे, कचरा जाळणे, सार्वजनिक ठिकाणी वाहने किंवा भांडी धुणे तसेच पाळीव प्राण्यांमुळे अस्वच्छता पसरवणे, अशा विविध उल्लंघनांवरही महापालिकेने कारवाई केली.

मुंबईतील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने नियमभंग करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. १ ते २८ सप्टेंबरदरम्यान करण्यात आलेल्या कारवाईत १,३३६ प्रकरणांमध्ये एकूण १८ लाख ७० हजार ३५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कारवाईमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन विभागातील सर्व सहाय्यक अभियंत्यांना विशेष मोबाईल अॅप्लिकेशन आणि पोर्टेबल प्रिंटरचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रणालीद्वारे नियमभंगाचे छायाचित्र घेऊन संबंधित व्यक्तीला जागेवरच ई-पावती दिली जाणार आहे. दंडाची रक्कम थेट महापालिकेच्या खात्यात जमा होणार आहे.

“केवळ दंड वसूल करणे हा या कारवाईचा उद्देश नसून मुंबईच्या स्वच्छतेमध्ये कायमस्वरूपी सुधारणा घडवून आणणे हा आहे. त्यामुळे नागरिक, व्यापारी, कंत्राटदार आणि फेरीवाल्यांनी स्वच्छतेच्या नियमांचे तंतोतंत पालन करून महापालिकेला सहकार्य करावे,” असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी केले.

Related Articles

Back to top button