गणेशोत्सवात पदपथ, रस्त्यांवर जाहिरातींना मनाई

मुंबई: गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात मुंबईतील रस्ते आणि पदपथांवर पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने जाहिराती लावू नयेत, असे निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. उत्सव काळात गणेशदर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने पादचाऱ्यांना सुरक्षित आणि सुलभ मार्ग उपलब्ध देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियानाच्या पार्श्वभूमीवर उत्सव मंडळांनी तसेच जाहिरातदारांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन आयुक्त भिडे यांनी केले. रस्ते आणि पदपथांवर अनधिकृतपणे जाहिराती लावू नयेत. पादचाऱ्यांना अथवा वाहतुकीला अडथळा ठरणारे जाहिरात फलक तातडीने हटविण्याची कार्यवाही अनुज्ञापन विभागाने करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
जाहिरातींबाबतचे प्रमुख नियम
- गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ व इतर प्रतिबंधित उत्पादनांच्या जाहिराती प्रदर्शित करणे टाळावे.
- जाहिरातींमुळे पदपथावरील पादचारी किंवा रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- मंडळाच्या पारंपरिक प्रवेशद्वाराच्या वरच्या आडव्या बाजूवर ‘भक्तांचे हार्दिक स्वागत’ संदेश लावता येईल. उजव्या व डाव्या उभ्या बाजूवर देणगीदारांची व्यावसायिक जाहिरात प्रदर्शित करता येईल.
- सामाजिक व नागरी संदेश प्रदर्शित करून जनजागृती करावी.
- डिजिटल स्क्रीन (१० बाय १० फूट मर्यादेपर्यंत) लावण्यासाठी वाहतूक विभाग व स्थानिक पोलीस ठाण्याचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील.
सार्वजनिक उत्सवाच्या कालावधीत तसेच विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित मंडळांनी जाहिरात फलक स्वतः काढून टाकावेत असें आवाहन भिडे यांनी केले आहे.



