मुंबई

मुंबईत १५ ठिकाणी उभारणार अत्याधुनिक ‘ॲस्पिरेशनल टॉयलेट्स’; पालिकेकडून १५.३० कोटींच्या निविदा जाहीर

​मुंबई : मुंबईतील प्रवेशद्वार,प्रमुख महामार्ग, समुद्रकिनारे आणि गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना दर्जेदार व स्वच्छ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने पाऊल उचलले आहे. पश्चिम उपनगरांमध्ये ‘पैसे द्या व वापरा’ या तत्त्वावर १५ अत्याधुनिक सार्वजनिक प्रसाधनगृहे उभारण्यासाठी पालिकेने निविदा आमंत्रित केल्या आहेत. या प्रकल्पाची अंदाजित किंमत १५.३० कोटी रुपये असून, पावसाळ्यासह १८ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असल्याची माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

​केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान-नागरी २.०’ अंतर्गत प्रोत्साहन देण्यात आलेल्या ‘ॲस्पिरेशनल टॉयलेट्स’ या संकल्पनेवर ही प्रसाधनगृहे आधारित असतील. यामध्ये स्वच्छता, सुरक्षितता, सुलभ प्रवेश आणि सर्वसमावेशकतेला प्राधान्य दिले जाणार आहे.

​प्रसाधनगृह वैशिष्ट्येपूर्ण तयार करण्यात येणार असून त्यात ​सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध असतील.महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था, दिव्यांग आणि तृतीयपंथी व्यक्तींसाठी विशेष सोय असेल.यासाठी ​पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून पाण्याची बचत करणारी उपकरणे, सौर पॅनेल आणि पाणी साठवणुकीची उत्तम व्यवस्था असेल.प्रसाधनगृहांमध्ये
​आरोग्य व सुरक्षिततेवर भर देण्यात आला आहे. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, सीसीटीव्ही देखरेख आणि आकर्षक वास्तुरचना असणार आहे.

​प्रवासी आणि पर्यटकांना मोठा दिलासा :

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला (आनंदवन पोलीस चौकीजवळ) आणि बोरिवली येथील नॅशनल पार्क उड्डाणपुलाखालील प्रस्तावित प्रसाधनगृहांमुळे वाहनचालक व प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. याशिवाय जुहू, वर्सोवा व अक्सा समुद्रकिनारे, अंधेरी रेल्वे स्थानक परिसर आणि डी. एन. नगर मेट्रो स्थानकाजवळ ही सुविधा उभारली जाणार असल्याने पर्यटक व दैनंदिन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

​सुधारित धोरणाचा मसुदा सादर :

दरम्यान, पालिकेने ‘पैसे द्या व वापरा’ या धोरणाचा सुधारित मसुदा आयुक्तांसमोर सादर केला आहे. यात विद्यमान प्रसाधनगृहांचे उन्नतीकरण, सुविधांचे प्रमाणीकरण, संचालन संस्थांची पारदर्शक निवड आणि उत्तरदायित्व निश्चित करण्याचे प्रस्तावित आहे अशी माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

गेल्या महापालिकेच्या महासभेत अनेक नगरसेवकांनी याबाबत मुद्दा मांडला होता त्याची लवकरात लवकर दखल घेऊन कारवाही करण्याचे महापौर रितू तावडे यांनी प्रशासनाला निर्देश दिले होते.

​प्रस्तावित १५ ठिकाणे:

​आनंदवन पोलीस चौकीजवळ, पश्चिम द्रुतगती महामार्ग, वाकोला
​विमानतळ प्राधिकरणाचे वाहनतळ, जुहू समुद्रकिनारा, विलेपार्ले (पश्चिम)
​जुहू समुद्रकिनारा (विद्यमान प्रसाधनगृहाची जागा), विलेपार्ले (पश्चिम)
​वर्सोवा समुद्रकिनाऱ्याजवळ (सागर कुटीर)
​यशराज स्टुडिओजवळील सुविधा भूखंड, अंधेरी (पश्चिम)
​फन रिपब्लिकजवळील सुविधा भूखंड, अंधेरी (पश्चिम)
​अंधेरी रेल्वे स्थानक परिसर (पश्चिम बाजू)
​शीतलादेवीजवळ, डी. एन. नगर मेट्रो स्थानकालगत, अंधेरी (पश्चिम)
​NMIMS समोर, वैकुंठलाल मेहता मार्ग, विलेपार्ले (पश्चिम)
​आरे गार्डन येथील तलावाजवळ, आरे मार्ग, गोरेगाव
​मृणालताई गोरे उड्डाणपुलाखाली, गोरेगाव (पश्चिम)
​अक्सा समुद्रकिनाऱ्याजवळ, मालाड
​महाराणा प्रताप मैदानासमोरील सुविधा भूखंड, मालाड (पश्चिम)
​नॅशनल पार्क उड्डाणपुलाखाली, बोरिवली
​नॅशनल पार्क उड्डाणपुलालगत, बोरिवली

Related Articles

Back to top button