Best bus -बेस्टचा बसप्रवाशांना दिलासा; अतिरिक्त फेऱ्या, मार्गांचा विस्तार अन् एसी सेवा

मुंबई: मुंबईची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या बेस्टच्या परिवहन सेवेत सोमवार दिनांक ५ ऑक्टोबरपासून बससेवेत काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची संख्या आणि मार्गांची गरज लक्षात घेऊन काही बसमार्गांचे सुसूत्रीकरण, विस्तार आणि अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. तसेच आठ सर्वसाधारण बसमार्गांचे वातानुकूलित बससेवेत रूपांतरही करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित मार्गांवरील प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
‘बेस्ट’ प्रशासनाने १५३, २२३, २४२, २४९, २६६, ३१२, ४२३ आणि सी-५०५ या आठ मार्गांवरील सर्वसाधारण बससेवा वातानुकूलित सेवेत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत सध्या सुमारे २,८०० बेस्ट बस धावत आहेत. विविध मार्गांवरील प्रवासी प्रतिसादाचा आढावा घेऊन वेळोवेळी बसमार्गांमध्ये बदल करण्यात येतात. त्यानुसार ‘ए-२२’, ‘ए-३५’ आणि ‘ए-३९’ या तीन बसमार्गांचे प्रवर्तन यापुढे मजास आगाराऐवजी सीप्झ बस स्थानक येथे समाप्त करण्यात येणार आहे.
‘ए-३०’ मार्गावरील रमाबाई नगर ते विक्रोळी आगारदरम्यान विक्रोळी रेल्वे स्थानक उड्डाणपुलामार्गे होणारे प्रवर्तन रद्द करून, रमाबाई नगर–घाटकोपर बसस्थानक–नित्यानंद नगर–श्रेयस सिनेमा जंक्शन–लालबहादूर शास्त्री मार्गे विक्रोळी आगार अशी बससेवा चालविण्यात येणार आहे.
अतिरिक्त फेऱ्यांसह मार्गांचा विस्तार
‘ए-६२’ मार्गाच्या प्रवर्तनातही बदल करण्यात आला आहे. वत्सलाबाई देसाई चौक (हाजीअली) ते पंडित पलुस्कर चौक हा मार्ग रद्द करून, वत्सलाबाई देसाई चौक येथून मदन मोहन मालवीय मार्गे वसंतराव नाईक चौक (ताडदेव)पर्यंत बससेवा चालविण्यात येणार आहे.
‘ए-२००’ मार्गाचा वडाळा आगारापासून विस्तार करण्यात येणार असून, रफी अहमद किडवाई मार्ग, झकेरिया बंदर मार्ग आणि श्रीकांत केशव हडकर मार्गे श्रावण यशवंते चौक (काळाचौकी)पर्यंत बससेवा वाढविण्यात येणार आहे.
‘ए-४२’ मार्गावर सॅन्डहर्स्ट रेल्वे स्थानक ते गोल देऊळदरम्यान सकाळी ८.३० ते रात्री ९ या वेळेत अतिरिक्त फेऱ्या चालविण्यात येतील. तसेच ‘ए-२४५’ आणि ‘ए-२७६’ मार्गांवर सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ४.३० ते रात्री ९.३० या वेळेत अतिरिक्त फेऱ्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
बोरिवली–घाटकोपर सेवा बंद
प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने बोरिवली स्थानक पूर्व ते घाटकोपर आगारदरम्यान धावणाऱ्या ‘ए-४७१’ मार्गाची सेवा रद्द करण्याचा निर्णय ‘बेस्ट’ प्रशासनाने घेतला आहे. या बदलांची अंमलबजावणी सोमवार, ५ ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे.



