मुंबई

तब्बल ८४ वर्षांनंतर मुंबई विमानतळाचे ‘हे’ टर्मिनल होणार बंद! जाणून घ्या सविस्तर वृत्त…

मुंबई: देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (CSMIA) प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई विमानतळाच्या ऐतिहासिक टर्मिनल-१ चा (T1) संपूर्ण पुनर्विकास (Redevelopment) करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून तब्बल ८४ वर्षांनंतर ऑक्टोबर २०२६ अखेरपर्यंत टर्मिनल-१ हे प्रवासी सेवांसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

टर्मिनल-१ च्या उत्तर भागाचे पाडकाम १५ जानेवारी २०२७ पासून सुरू होणार असून, त्या ठिकाणी अत्याधुनिक आणि भव्य पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. तोपर्यंत येथील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे टप्प्याटप्प्याने मुंबईच्या टर्मिनल-२ (T2) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) स्थलांतरित केली जात आहेत.

उड्डाणे T2 आणि नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने हवाई वाहतूक T2 आणि नवी मुंबई विमानतळादरम्यान विभागण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे. पहिला टप्पा १ ऑक्टोबरपासून एकूण आंतरराष्ट्रीय उड्डाणांपैकी किमान एक तृतीयांश (1/3rd) उड्डाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वळवण्यात येत आहेत.

दुसरा टप्पा २५ ऑक्टोबरपासून टर्मिनल-१ वरून चालणाऱ्या डोमेस्टिक हवाई वाहतुकीचा एक तृतीयांश भाग टर्मिनल-२ वर हलवला जाईल. त्यानंतर १५ जानेवारी २०२७ रोजी पाडकाम सुरू होण्यापूर्वी विमान कंपन्यांना कामकाज सुरळीत करण्यासाठी साधारण साडेतीन महिन्यांचा संक्रमण कालावधी देण्यात आला आहे.

प्रवाशांवर काय परिणाम होणार?

पश्चिम उपनगरे आणि मुंबई शहरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जर नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण करावे लागले, तर त्यांना रस्त्याने लांबचा प्रवास करावा लागणार आहे. वाढत्या अंतरामुळे कॅब किंवा खाजगी वाहनांचा प्रवासाचा खर्च वाढेल. तसेच मुंबई-नवी मुंबईला जोडणारे महामार्ग आणि अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर (MTHL) गर्दीच्या वेळेत वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता आहे.

रनवेवरील ताण कमी होणार; विमानांचे उड्डाण जलद गतीने!

सध्या मुंबई विमानतळावर मुख्य ॲक्टिव्ह रनवेवरून सर्व विमानांचे संचलन होते. हवाई वाहतूक नवी मुंबईकडे वळवल्यामुळे मुंबईच्या रनवेवर लँडिंगसाठी विमानांना करावी लागणारी प्रतीक्षा (Holding Time) कमी होईल आणि टेकऑफ अधिक वेगाने होईल.

एअरक्राफ्ट ट्रॅफिक कमी झाल्यामुळे विमाने उशिरा धावण्याच्या समस्येत मोठी घट होईल. याशिवाय खाजगी आणि चार्टर्ड विमानांचे कामकाजही नवी मुंबईत हलवण्यात आल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

टर्मिनल-१ चा पुनर्विकास का गरजेचा?

टर्मिनल-१ हे सुमारे ८० ते ८४ वर्षे जुने असून, त्याची सध्याची प्रवासी हाताळणी क्षमता वार्षिक केवळ दीड कोटी इतकीच मर्यादित आहे (तर टर्मिनल-२ ची क्षमता चार कोटी प्रवासी हाताळण्याची आहे). भविष्यातील वाढती हवाई वाहतूक आणि प्रवाशांच्या आधुनिक सुविधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी टर्मिनल-१B चा उत्तर भाग पूर्णपणे तोडून त्या जागी अत्याधुनिक, हायटेक टर्मिनल विकसित केले जाणार आहे.

Related Articles

Back to top button