मुंबई

मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठी १ ते १५ ऑक्टोबर विशेष अभियान

पादचारी प्रथम’ अभियानात सातत्य ठेवण्याचे आयुक्तांचे निर्देश

मुंबई :
दरवर्षी मुंबईत ऑक्टोबर महिन्यानंतर वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होतो.यावर्षी आधीच तयारी करण्यात आली असून महापालिका आयुक्तांनी बैठक घेऊन वायू प्रदूषण नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांना निर्दश दिले आहेत.

श्रीगणेशोत्सव आणि पावसाळ्यात केलेल्या नियोजनाप्रमाणेच आगामी काळात मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी अधिकाऱ्यांना दिले. वायू प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी महापालिकेने जारी केलेल्या २८ मुद्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

महापालिका मुख्यालयात शुक्रवारी विविध विभाग, खात्यांचे कामकाज, प्रकल्प आणि उपक्रमांचा मासिक आढावा घेण्यात आला. यावेळी आयुक्त भिडे बोलत होत्या. सध्या मुंबईतील वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) नियंत्रणात असला तरी आगामी काळात तो वाढू नये यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

१ ते १५ ऑक्टोबरदरम्यान विशेष अभियान राबवून रस्ते धुणे, मोठ्या बांधकाम प्रकल्पांभोवती आवरण लावणे आदी उपाययोजना पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच वायू प्रदूषण वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या मोठ्या प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासही सांगण्यात आले.

‘पादचारी प्रथम’ अभियानाला गती

मुंबईतील सुमारे ३०७ किलोमीटर लांबीच्या २०० पदपथांची निवड ‘पादचारी प्रथम’ अभियानासाठी करण्यात आली आहे. या पदपथांवरील अडथळे दूर करून ते पादचाऱ्यांसाठी सुलभ करण्यात येत असून, या कामाचे दृश्य परिणाम दिसून येत असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. अभियान अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी कार्यवाहीत सातत्य ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

८७ हजार तक्रारी; ६४ टक्के तक्रारींचे निराकरण

नागरिकांच्या तक्रारी या महापालिकेच्या कामकाजाचे वास्तव मूल्यमापन करणाऱ्या असल्याने त्यांचे गांभीर्याने आणि वेळेत निराकरण करावे, असेही आयुक्तांनी सांगितले. ‘मार्ग’ प्रणालीवर आतापर्यंत ८७ हजार ४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी सुमारे ६४ टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. तक्रारी ज्या स्तरावर सोडवणे अपेक्षित आहे, त्याच स्तरावर त्यांचे निराकरण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

१३९ वाहतूक कोंडीच्या ठिकाणांवर उपाययोजना

मुंबईतील वाहतूक कोंडीचे ‘बॉटलनेक’ ठरणारी सुमारे १३९ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणांचा सखोल अभ्यास करून आवश्यकतेनुसार नियमबाह्य बांधकामे रितसर निष्कासित करून वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

दरम्यान, रस्ते, पूल, मलनिस्सारण, पर्जन्य जलवाहिन्या आदी प्रकल्पांच्या प्रगतीवर संबंधित परिमंडळांच्या उपआयुक्तांनी लक्ष ठेवावे, अशा सूचनाही देण्यात आल्या. प्रकल्पबाधित व्यक्तींची (PAP) यादी संबंधित विभागांनी वेळेत सादर करावी, जेणेकरून प्रकल्पांच्या कामांना विलंब होणार नाही, असे आयुक्त भिडे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button