मुंबईत बेस्ट बसचा सलग दुसऱ्यादिवशी अपघात.

मुंबई : मुलुंडमधील रॅली वुल्फ परिसरात रविवारी पहाटे बेस्ट बस आणि ट्रॅव्हल्स बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या दुर्घटनेत बेस्ट बसचा चालक संदीप नामदेव कारंडे (वय 40) जखमी झाला असून त्याच्यावर मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेस्टची बस क्रमांक 7715 (MH-01-DR-5024) ही सिप्झ येथून तीन हात नाका येथे जात होती. सकाळी सुमारे 5.50 वाजता रॅली वुल्फ परिसरात मेट्रोच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. यावेळी समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स बस क्रमांक MH-09-FL-1044 ने बेस्ट बसला जोरदार धडक दिली.
या धडकेत बेस्ट बस चालकाच्या पोटाला स्टेअरिंगचा जोरदार मार लागला, तसेच उजव्या पायाला दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. अपघातानंतर बेस्ट बसच्या बोनेटच्या भागात आग लागली. मात्र, बस वाहकाने प्रसंगावधान राखत बसमधील अग्निशामक यंत्राच्या मदतीने आग तात्काळ विझवली.
दरम्यान, प्रवाशांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले; मात्र त्यापूर्वीच आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली होती. त्यानंतर वाहकाने जखमी चालकाला उपचारासाठी अग्रवाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
या अपघाताची माहिती बेस्टच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली असून अपघातग्रस्त बस रस्त्यावरून हटवण्यासाठी एल.एम. लॉरी/रेकर पाठविण्याची कार्यवाही करण्यात आली. वाहतूक अधिकारी, अपघात निरीक्षक आणि बस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू आहे.



