मुंबई

NCMC Card Controversy : एसटीच्या कार्ड योजनेवर प्रश्नचिन्ह; कंत्राटदार कंपनीची चौकशी करा — श्रीरंग बरगे

मुंबई : एसटी महामंडळाच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) योजनेमुळे प्रवासी आणि वाहकांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे या प्रकल्पाची तसेच कंत्राटदार कंपनीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी एसटी कामगार काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

१ ऑक्टोबरपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, कार्ड वापरताना वाहकांना वारंवार तांत्रिक अडचणी येत असल्याचे बरगे यांनी सांगितले. ऑनलाइन तिकीट काढताना सवलत उपलब्ध असल्याचे दिसत असतानाही NCMC कार्ड सक्तीचे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

NCMC कार्ड काढण्याची प्रक्रियाही किचकट असल्याचे बरगे यांनी म्हटले आहे. १९९ रुपयांचे कार्ड काही खासगी एजंटकडून २५० ते ३०० रुपयांना विकले जात असल्याच्या तक्रारी आहेत. या प्रकाराची चौकशी करून अतिरिक्त पैसे घेणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

कार्डमध्ये पुरेसा बॅलन्स असूनही काही वेळा ते मशीनमध्ये रीड होत नाही. QR कोड असलेली पावती स्कॅन होत नाही. काही वेळा खात्यातून पैसे वजा होतात; मात्र तिकीट प्रिंट होत नाही. नेटवर्क आणि सर्व्हरच्या समस्यांमुळेही प्रवासी आणि वाहकांना त्रास होत असल्याचे बरगे यांनी सांगितले.

NCMC प्रकल्पासाठी कंत्राटदार कंपनीची निवड करताना झालेली निविदा प्रक्रिया, करारातील अटी आणि प्रकल्पाची अंमलबजावणी यांची चौकशी करावी. वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात कंपनीला यश येत नसेल, तर या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा फेरविचार करावा, अशी मागणी बरगे यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button