मुंबई

मोगरा पंपिंग स्टेशनच्या कामाला अखेर मुहूर्त,दोन दशकानंतर १५ ऑक्टोबरपासून कामाला सुरुवात

वर्सोवा, अंधेरी, जोगेश्वरीतील पूरस्थितीला मिळणार दिलासा;

मुंबई : सुमारे दोन दशकांपासून रखडलेल्या मोगरा पंपिंग स्टेशन कामाला १५ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. या प्रकल्पाला आवश्यक पर्यावरणविषयक मंजुऱरी मिळाली आहे.ह्या प्रकल्पामुळे वर्सोवा, अंधेरी आणि जोगेश्वरी परिसरातील पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या सुटण्याची शक्यता आहे.

ओशिवरा आणि लोखंडवाला परिसरातील मोगरा नाल्याजवळ हे पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात भरती-ओहोटी नियंत्रित करणारे दरवाजे, संरक्षक भिंती आणि पूरक पायाभूत सुविधांचा समावेश आहे. ३९३ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचा कालावधी २४ महिने निश्चित करण्यात आला होता. २०२१ मध्ये प्रकल्पाला मंजुरी मिळाली; मात्र भूसंपादनातील अडथळे तसेच वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याच्या जागेशी संबंधित वादामुळे प्रकल्प रखडला.

मार्च २०२५ मध्ये प्राथमिक कामाला सुरुवात झाली होती. मात्र त्यानंतर प्रकल्पाची जागा लोखंडवाला क्रीक रोडजवळ हलवावी लागली. त्यामुळे कोस्टल रेग्युलेशन झोनची नव्याने मंजुरी तसेच केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाची अंतिम परवानगी आवश्यक झाली. आता सर्व पर्यावरणविषयक मंजुऱ्या मिळाल्याची माहिती वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने दिली आहे.

प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे तीन वर्षांचा कालावधी अपेक्षित असला, तरी २०२९ पूर्वी मोगरा पंपिंग स्टेशन कार्यान्वित करण्याचे पालिका प्रशासनाचे लक्ष्य आहे. मुंबईतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी आखण्यात आलेल्या सुमारे १३ हजार कोटी रुपयांच्या एकात्मिक पूर नियंत्रण कृती योजनेतील हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या योजनेत गटार व पंपिंग यंत्रणेचे आधुनिकीकरण, पावसाच्या पाण्याचा निचरा वाढवणे, मिठी नदीचे पुनरुज्जीवन आणि पूर नियंत्रणासाठी निसर्गाधारित उपाययोजनांचा समावेश आहे.

सखल भागांना मोठा दिलासा

लिंक रोड, वीरा देसाई रोड तसेच अंधेरीतील अन्य सखल भागांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. मोगरा पंपिंग स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतर या भागातील पाणी निचरा यंत्रणेला मोठी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, मोगरा नाल्यात सोफा तसेच अन्य अवजड कचरा टाकला जात असल्याने पाण्याचा प्रवाह अडतो आणि नाल्याची वहनक्षमता कमी होते. त्यामुळे नाल्यात कचरा टाकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.

भरतीच्या काळात पूरद्वार बंद झाल्यानंतर पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठी पंपिंग स्टेशन्स महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईत इर्ला पंपिंग स्टेशन २०१० मध्ये कार्यान्वित झाले. त्यानंतर हाजी अली, क्लीव्हलँड, लव्हग्रोव्ह, रे रोड-ब्रिटानिया आणि खार दांडा येथील गझदरबंद पंपिंग स्टेशन्स कार्यान्वित करण्यात आली.

मात्र मोगरा आणि माहूल ही दोन पंपिंग स्टेशन्स अद्याप प्रलंबित आहेत. २६ जुलै २००५ च्या महापुरानंतर ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत चितळे समितीने शिफारस केलेल्या आठ पंपिंग स्टेशन प्रकल्पांमध्ये मोगरा आणि माहूलचा समावेश होता. तब्बल दोन दशकांनंतर मोगरा प्रकल्पाच्या कामाला आता सुरुवात होत असल्याने पश्चिम उपनगरातील पूरप्रश्नावर तो कितपत प्रभावी ठरतो, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button