विरोधकांना सुबुद्धी मिळो, कुबुद्धीचे विसर्जन होवो’- मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांना वेग आला असून, विविध गणेश मंडळे आणि भाविकांकडून शिस्तबद्ध पद्धतीने बाप्पाला निरोप दिला जात आहे. गिरगाव चौपाटीवर होणाऱ्या विसर्जन सोहळ्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या उत्साहानंतर भाविकांकडून लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे. मुंबईतील विविध विसर्जन मार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असली तरी पोलिस, महापालिका आणि वाहतूक यंत्रणेकडून करण्यात आलेल्या नियोजनामुळे मिरवणुका शिस्तीत पार पडत आहेत.
गिरगाव चौपाटीवरील व्यवस्थेबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांच्या नियोजनाचे कौतुक केले. गणेशोत्सव हा आनंदाचा आणि उत्साहाचा पर्व असल्याचे सांगत नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेत विसर्जन सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. “विरोधकांना सुबुद्धी यावी आणि कुबुद्धीचे विसर्जन व्हावे, अशी मागणी आपण बाप्पाकडे करतो,” असे ते म्हणाले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुंबईतील विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी होत असतानाही शिस्त कायम असल्याचे सांगितले. गणपती विसर्जनाचा दिवस हा भाविकांसाठी आनंद आणि भावनिक क्षणांचा संगम असल्याचे त्यांनी नमूद केले.
“एका डोळ्यात आनंद, तर दुसऱ्या डोळ्यात बाप्पाला निरोप देण्याचे दुःख असते. लाखो भाविक हा सोहळा अनुभवत आहेत. आपल्या उत्सवामुळे इतरांना त्रास होणार नाही, याची गणेश मंडळांकडूनही काळजी घेतली जात आहे,” असे शिंदे यांनी सांगितले.
मुंबईतील विसर्जन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई महापालिका, मुंबई पोलिस आणि वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेल्या नियोजनाबद्दल शिंदे यांनी संबंधित यंत्रणांचे आभार मानले. मुंबई आणि पुण्यात गणेश विसर्जनाचा सोहळा मोठ्या प्रमाणावर होत असून, तो शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही शिंदे यांनी भाष्य केले. बळीराजाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असून यापुढेही शेतकऱ्यांना सरकारचा पाठिंबा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.



