Mantralaya Canteen चा होणार कायापालट; आधुनिकीकरणासाठी 2.88 कोटी.

मुंबई : मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांसाठी असलेल्या दोन प्रमुख कॅन्टीनच्या स्वयंपाकघरांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने तब्बल 2 कोटी 88 लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय आणि आर्थिक मंजुरी दिली आहे. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील ‘मंत्रालय कॅन्टीन’ आणि विस्तार इमारतीतील ‘चौरस कॅन्टीन’ या दोन्ही उपाहारगृहांच्या स्वयंपाकघरांचा या प्रकल्पात समावेश आहे.
एकूण मंजूर निधीपैकी 1 कोटी 76 लाख रुपये मंत्रालय कॅन्टीनच्या स्वयंपाकघरासाठी, तर 1 कोटी 12 लाख रुपये चौरस कॅन्टीनच्या स्वयंपाकघरासाठी खर्च केले जाणार आहेत. या निधीतून जुन्या उपकरणांची जागा आधुनिक यंत्रसामग्री घेणार असून स्वयंपाकघरातील आवश्यक पायाभूत सुविधा आणि इतर साहित्यही अद्ययावत केले जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने या खर्चाला मंजुरी दिली आहे.
या प्रकल्पासाठी नागपूर येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या पर्यटन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत विरखारे यांची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी दोन्ही स्वयंपाकघरांची पाहणी केल्यानंतर तेथील सुविधांचे तातडीने नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करण्याची शिफारस केली. त्यांच्या पाहणीच्या आधारे स्वयंपाकघरांचे सविस्तर आराखडे तसेच आवश्यक उपकरणे आणि साहित्याची यादी तयार करण्यात आली. त्यानंतर सरकारने आधुनिकीकरणाच्या कामाला आणि त्यासाठी आवश्यक निधीला मंजुरी दिली.
या प्रकल्पाचा खर्च 2026-27 या आर्थिक वर्षासाठी मंजूर करण्यात आलेल्या संबंधित अर्थसंकल्पीय शीर्षकातील अनुदानातून भागवला जाणार आहे. आधुनिकीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर मंत्रालयातील दोन्ही कॅन्टीनच्या स्वयंपाकघरातील सुविधा अधिक आधुनिक आणि कार्यक्षम होण्याची अपेक्षा आहे. याचा लाभ मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कामांसाठी मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांना होणार आहे.



