मुंबई

आझाद मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली; जरांगे पाटील संतप्त

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार आहे . मात्र, मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. या निर्णयाने जरांगे पाटील संतप्त झाले असून त्यांनी आजपासून सलाईन व पाणी बंद करण्याची घोषणा केली आहे. ते १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर जरांगे पाटील म्हणाले, “आम्ही न्यायदेवतेच्या भूमिकेशी बांधील आहोत, पण सरकारच्या भूमिकेला बांधील नाही. सरकारच्या नियमांना आम्ही मानत नाही. फडणवीस यांनी पुन्हा एकदा मराठ्यांवर अन्याय केला आहे. राज्य अस्थिर करण्याचे काम फडणवीस आणि त्यांचे सरकार करीत आहे. गणेशोत्सव मिरवणुका होणार नाहीत का? देवेंद्र फडणवीस यांनी रचलेले हे षडयंत्र आहे.”

पुढे ते म्हणाले, “मागील वर्षी हा कायदा नव्हता का? मग आता कसा आला? मुख्यमंत्र्यांना जातीत वाद लावायचा आणि हिंदू सणात राज्य दूषित करायचे आहे. त्यांनी मला गोळ्या घालून मारायचे षडयंत्र रचले आहे. आम्ही १५ तारखेला इथून जाणार आणि १९ ला मुंबईत असू. आजपासून मी सलाईन, पाणी सर्व बंद करणार. तुम्ही आमच्यावर अन्याय करणार, हे आम्हाला मान्य नाही. याला सर्वस्वी जबाबदार फडणवीस सरकार असेल.”

पोलिसांनी परवानगी का नाकारली?

आझाद मैदानावर प्रस्तावित आंदोलन, उपोषण व धरणेबाबतचा अर्ज १२ सप्टेंबर रोजी प्राप्त झाला होता. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र शासन राजपत्र (२६ ऑगस्ट २०२५) अन्वये जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका (अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, मुंबई) नियम २०२५ लागू करण्यात आले आहेत. या नियमावलीनुसार आझाद मैदानाचा काही भाग आंदोलनासाठी निश्चित करण्यात आला आहे. मात्र, नियम क्र. ११ (ड) नुसार आंदोलनात सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती आत्मदहन वा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा उपोषण करणार नाही, असे स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे परवानगी नाकारण्यात आली असल्याचे पोलिसांनी कळविले आहे.

विखे पाटील यांची विनंती

या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांना मुंबईला जाण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले, “जरांगे पाटील यांच्या भावनांचा आम्ही नेहमीच आदर केला आहे. त्यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे केले. आम्ही त्यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली. आजही आणि उद्याही आम्ही त्यांचा आदर करू. मात्र, माझी विनंती आहे की त्यांनी आंदोलनाचा मार्ग पुकारण्याऐवजी आता आंदोलन थांबवावे. मराठा बांधवांसाठी त्यांनी जे काम केले आहे, त्याबद्दल सरकारच्या मनात आदर आहे. अजूनही काही संधी असेल तर आम्ही त्यावर निश्चितपणे विचार करू असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे मुंबईत येण्यावर ठाम आहे. त्यामुळे काही दिवसांत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आणि आंदोलकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button