मानखुर्दमध्ये दोन पार्किंग हब ,मुंबईच्या वाहतूक कोंडीवर मोठा उपाय.

मुंबई : मुंबई शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मानखुर्द येथे तब्बल दोन हजार कोटी रुपयांच भव्य पार्किंग हब उभारण्यात येणार आहे. मानखुर्द येथील जकात नाक्याच्या परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, मुंबईत येणाऱ्या वाहनांची गर्दी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
या प्रस्तावित पार्किंग हबमध्ये तब्बल पाच मजली पार्किंग व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यासोबत २१ मजली हॉटेल, व्यावसायिक गाळे तसेच प्रवाशांसाठी विविध सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांना शहराच्या मध्यवर्ती भागात येण्यापूर्वी मानखुर्द येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा यामागील प्रमुख उद्देश आहे.
मानखुर्द हे मुंबईच्या पूर्व उपनगरातून शहरात प्रवेश करण्याचे महत्त्वाचे ठिकाण असल्याने या परिसरात मोठ्या क्षमतेचे पार्किंग हब उभारल्यास शहरातील रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. वाहनचालकांसोबतच प्रवाशांच्या सोयीसाठीही या हबमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू असून, येत्या पाच ते सहा महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर पुढील वर्षी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या प्रवेशद्वारावरील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत असताना वाहनांसाठी मोठ्या क्षमतेची पार्किंग व्यवस्था निर्माण करणे, तसेच प्रवाशांसाठी व्यावसायिक व इतर सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, हा या प्रकल्पाचा केंद्रबिंदू आहे.
गेले अनेक वर्षे जलन नका बंद झाला त्यामुळे मोठी जागा या ठिकाणी उपलब्ध असून ती रिकामीच आहे.त्यामुळे मानखुर्दमधील प्रस्तावित पार्किंग हब मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी कितपत प्रभावी ठरतो, याकडे आता लक्ष लागले आहे.



